गांजा तस्करीचे कनेक्शन आंतरराज्यीय टोळीशी
By Admin | Updated: September 3, 2016 01:17 IST2016-09-03T01:17:04+5:302016-09-03T01:17:04+5:30
‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती एक अॅम्ब्युलन्स लागली. यात मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.

गांजा तस्करीचे कनेक्शन आंतरराज्यीय टोळीशी
६२ बॉक्समध्ये सापडला ७६५ किलो गांजा : मध्य प्रदेशातील रिवामध्ये धाडसत्र
नागपूर : ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती एक अॅम्ब्युलन्स लागली. यात मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला. हा गांजा आंतरराज्यीय टोळीचा होता. अॅम्ब्युलन्समध्ये ६२ बॉक्समध्ये ७६५ किलो गांजा सापडला. याची किंमत ७६ लाख ५१ हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीच्या शोधात तीन चमू मध्य प्रदेशातील रिवा येथे पाठविल्या आहे. तिथे अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या.
गुरुवारी रात्री ९.४५ वाजता कळमना पोलीस ठाणे हद्दीत कापसी पुलाजवळ एका अॅम्ब्युलन्समध्ये गांजा जप्त करण्यात आला. अॅम्ब्युलन्स चालक आणि त्याचा साथीदार फरार झाले. भंडारा रोडवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाईसाठी येथे वाहतूक पोलीस तैनात केले जातात. इंदोरा शाखेतील पोलीस कर्मचारी प्रशांत मिसाळ यांना भंडाराकडे जात असलेल्या अॅम्ब्युलन्सचा चालक निष्काळजीपणे वाहन चालवित असल्याचे आढळून आले. प्रशांतने एमपी/ १७/ डी/ ०२५२ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्स चालकाला थांबण्याचा इशारा केला. त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. पोलीस कर्मचाऱ्याने बाईकने अॅम्ब्युलन्सचा पाठलाग केला. अॅम्ब्युलन्स चालकाने सरळ न जाता हैद्राबादच्या दिशेने गाडी वळवली. परंतु त्याच वेळी प्रशांतने त्याला अडवले. वाहनचालक खाली उतरला. पोलीस कर्मचारी त्याला वाहनाचे कागदपत्र मागू लागला. त्याचवेळी चालकाचा साथीदार पळू लागला. प्रशांत त्याच्या दिशेने पळू लागताच चालकही फरार झाला. पोलीस कर्मचाऱ्याने अॅम्ब्युलन्सची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. ज्या पद्धतीने गांजाचे पॅकिंग करण्यात आले होते, त्यावरून तस्कर हे व्यावसायिक असल्याचे दिसून येते. गांजाची गुणवत्ता कमजोर आहे. यासारख्या गांजाची मागणी लहान शहरांमध्ये किंवा गावांमध्ये अधिक असते. पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, पीएसआय नरेंद्र पुरी, हवालदार दत्ता बागुल, विठोबा काळे, प्रवीण फांदडे, शिपाई सतीश पाटील, नितीन रांगणे, किशोर महंत, तुलसी शुक्ला आणि नरेश शिंगणे यांनी कारवाई केली. (प्रतिनिधी)
मध्य प्रदेशाशी संबंध
सूत्रानुसार गांजा तस्कर मध्य प्रदेशातील रिवाशी संबंधित आहेत. अॅम्ब्युलन्सचा मालक बिछिया रिवा येथील मो. जफी खलील खान असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना अॅम्ब्युलन्समध्ये दोन मोबाईलसुद्धा सापडले. त्यांच्या आधारावर अॅम्ब्युलन्स कुठून आली, हे लक्षात येईल.
नशेत होता चालक
अॅम्ब्युलन्स चालक नशेत होता. त्यामुळेच तो पोलीस कर्मचाऱ्याला पाहून घाबरला. दोघेही पळून गेल्यावर पोलिसांनी लगेच भंडारा रोड परिसराची घेराबंदी केली. यानंतरही ते पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे ते यापूर्वी सुद्धा या रोडने येत-जात असल्याचा संशय आहे.