झाडांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश

By Admin | Updated: June 12, 2015 02:49 IST2015-06-12T02:49:52+5:302015-06-12T02:49:52+5:30

मनसर ते खवासा या ३७ किलोमीटर खराब रोडच्या चौपदरीकरणासाठी १० किलोमीटरपर्यंतची झाडे कापण्याचा मार्ग मोकळा

Instructions for evaluating the trees | झाडांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश

झाडांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश

हायकोर्ट : मनसर-खवासा रोडची दुरवस्था
नागपूर : मनसर ते खवासा या ३७ किलोमीटर खराब रोडच्या चौपदरीकरणासाठी १० किलोमीटरपर्यंतची झाडे कापण्याचा मार्ग मोकळा झाला असून उर्वरित २७ किलोमीटर रोडवरील कापावयाच्या झाडांचे २४ जूनपर्यंत मूल्यांकन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिलेत.
वन विभागातर्फे झाडांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. मूल्यांकनानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अहवाल सादर करण्यात येईल. त्यानुसार प्राधिकरणने आवश्यक रक्कम वन विभागाकडे जमा केल्यानंतर रोडच्या चौपदरीकरणाला सुरुवात करता येईल. न्यायालयाने १० किलोमीटर (किलोमीटर क्र. ६७९ ते ६८९) रोडवरील झाडे कापण्याचे आदेश उन्हाळ्याच्या सुट्यांपूर्वीच दिले होते. परंतु, वन विभागामुळे यासंदर्भात वाद निर्माण झाला होता. सृष्टी पर्यावरण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादातून झाडे कापण्यावर स्थगनादेश मिळविल्यानंतर ८ मे रोजी मुख्य वनसंरक्षकांनी नागपूर येथील अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून झाडे कापण्याचे काम थांबवायला लावले होते. यावरून ११ जून रोजी उच्च न्यायालयाने वन विभागाची कानउघाडणी केली होती. उच्च न्यायालयापेक्षा हरित लवादाचा आदेश मोठा आहे काय अशी विचारणा करून झाडे कटाई थांबविण्याचा आदेश मागे न घेतल्यास अवमाननेची कारवाई करण्याची तंबी दिली होती. यानंतर वन विभागाने वादग्रस्त आदेश मागे घेतला होता.
मनसर-खवासा रोडच्या दुरवस्थेची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे व अ‍ॅड. अनीश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Instructions for evaluating the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.