संस्था लावून देणार मुलीचे लग्न
By Admin | Updated: May 20, 2016 02:38 IST2016-05-20T02:38:54+5:302016-05-20T02:38:54+5:30
दुष्काळामुळे मुलीचे लग्न करण्यास असहाय्य ठरलेले मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हरिभाऊ बाबुराव लोहार हे पैशाची जमवाजमव करण्यासाठी नागपुरात भटकंती करीत आहेत.

संस्था लावून देणार मुलीचे लग्न
नागपूरकरांचे सरसावले हात : हरिभाऊला मदतही करणार
नागपूर : दुष्काळामुळे मुलीचे लग्न करण्यास असहाय्य ठरलेले मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हरिभाऊ बाबुराव लोहार हे पैशाची जमवाजमव करण्यासाठी नागपुरात भटकंती करीत आहेत. हरिभाऊची व्यथा लोकमतने समाजापुढे मांडली आणि सहृदयी नागपूरकरांनी हरिभाऊच्या मदतीसाठी हात पुढे केले. सकाळपासून हरिभाऊचा पत्ता विचारण्यासाठी लोकमतच्या कार्यालयात अनेकांचे फोन येत आहेत. काही संस्थांनी पत्रक पाठवून हरिभाऊच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे.
मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाने अनेकांचे जगणेच विस्कळीत केले आहे. आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या हरिभाऊवरही मुलीच्या लग्नाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. हरिभाऊ नागपुरात तुणतुणं घेऊन दारोदारी भटकून पै-पै जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. ७१ वर्षाच्या या वृद्धाची होत असलेली ससेहोलपट लोकमतने मांडल्यानंतर अनेकांनी त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते, सेवादल शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत कार्यकर्त्यांनी मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली. राजमाता जिजाऊ वैदर्भीय मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी स्वत: मदतीसाठी लोकमत कार्यालयात भेट दिली. संघर्ष वाहिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हरिभाऊच्या मदतीसाठी आवाहन केले. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीकडून विचारणा झाली. काहीचे वैयक्तिक फोन सुद्धा हरिभाऊच्या मदतीसाठी आले. लोहार समाज बांधव सुद्धा त्याच्या मदतीसाठी सरसावले. (प्रतिनिधी)
हरिभाऊची शोधाशोध
हरिभाऊ बुधवारी झिरो माईल येथे तुणतुणं वाजवित दारोदारी फिरत होता. संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे यांनी हरिभाऊची संपूर्ण माहिती घेतली. त्याच्या घरचा पत्ता घेऊन, स्थानिक संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी त्याची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर हरिभाऊ तेथून निघून गेला. गुरुवारी हरिभाऊची बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी त्याची शोधाशोध सुरू आहे.