स्वच्छतेसाठी यंत्रणा लावा, उघड्या नाल्यांवर पटाव टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:05+5:302021-07-28T04:09:05+5:30
उमरेड : उमरेड परिसरात कोरोनावर नियंत्रण असले तरी डेंग्यूचा आजार डोके वर काढत आहे. तपासणीअंती खासगी दवाखान्यात तसेच ग्रामीण ...

स्वच्छतेसाठी यंत्रणा लावा, उघड्या नाल्यांवर पटाव टाका
उमरेड : उमरेड परिसरात कोरोनावर नियंत्रण असले तरी डेंग्यूचा आजार डोके वर काढत आहे. तपासणीअंती खासगी दवाखान्यात तसेच ग्रामीण रुग्णालयात सुद्धा डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे आरोग्य विभाग तसेच नगरपालिकेने स्वच्छतेकडे आणि उपाययोजनांकडे जाणिवेने लक्ष द्यावे. शिवाय अशा विपरीत परिस्थितीत अधिक भक्कमपणे यंत्रणा राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दोन दिवसांपूर्वी ड्रीम सिटी येथे काजल शंभरकर नावाच्या तरुणीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पालिकेने नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांची आहे. सोबतच नागरिकांनी सुद्धा योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्यावतीने केले जात आहे.
उमरेड पालिकेकडे दोन फॉगिंग मशीन होत्या. दोन्ही मशीन १९९२ च्या आहेत. या मशीनला ८ वर्षे झाली असून सदर मशीन निकामी झाल्या आहेत. याबाबत पालिकेकडे विचारणा केली असता मागील काही दिवसांपासून दोन फॉगिंग मशीन शहरात फिरविल्या जात आहेत. अजून दोन फॉगिंग मशीन लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली. या चारही फॉगिंग मशीनचे कंत्राट देण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून फॉगिंग मशीन नादुरुस्त असताना पालिकेने नवीन फॉगिंग मशीन खरेदी का केल्या नाहीत, असाही सवाल विचारला जात आहे. स्वच्छतेकडे जाणिवेने लक्ष देणाऱ्या पालिकेच्या मालकीची एकही फॉगिंग मशीन नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
नाल्यांवर पटाव कधी?
उमरेड पालिकेने मागील काही वर्षांपासून मोठे नाले आणि नाल्यांवर पटाव टाकण्याचे नियोजन आखले. असे असले तरी अद्याप बहुतांश नाल्यांवर पटाव टाकण्यात आलेले नाहीत. उशिराने नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू झाल्याने अनेक नाल्यांमध्ये गाळ साचलेला आहे. अशावेळी नाल्या तुंबतात. नालीचे पाणी रस्त्यावर आणि रस्त्यावरून घरात अशी परिस्थिती काही परिसरात दिसून येते. ग्रीन सिटी परिसरात सुद्धा नाल्यांवर पटाव नाही. नाल्यांवर पटाव कधी, असा प्रश्न विचारला जात आहे. परिसरात डेंग्यू आजाराने मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
--
सध्या कावरापेठ, गांगापूर परिसरात फॉगिंग सुरू आहे. केवळ दोन फॉगिंगने अशक्य होणार असून लवकरच अजून दोन फॉगिंग मशीन सुरु करणार आहोत. पालिकेच्या वतीने पत्रक सुद्धा काढले आहे. नगर पालिका स्तरावर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. नागरिकांनी सुद्धा योग्य काळजी घ्यावी.
विजयलक्ष्मी भदोरिया
नगराध्यक्षा, नगर परिषद उमरेड
---
उमरेड ग्रीन सिटी परिसरातील नाल्यांवर पटाव टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.