बिहार बाबासाहेबांची प्रेरणाभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 03:56 IST2016-10-13T03:56:30+5:302016-10-13T03:56:30+5:30
राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते

बिहार बाबासाहेबांची प्रेरणाभूमी
राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन
नागपूर :राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारताना राष्ट्रहित सर्वाेच्च मानले. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र असली तरी प्रेरणाभूमी ही बिहार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याला सुरुवात केली.
अध्यक्षीय भाषणात भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनी आपले विचार मांडले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य अॅड. मा.मा. येवले, अॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुधीर फुलझेले, डी.जी. दाभाडे, विलास गजघाटे व्यासपीठावर होते.
संचालन अशोक जांभुळकर यांनी केले तर आभार विजय चिकाटे यांनी मानले. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते साप्ताहिक रिपब्लिकन संदेशचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित सूरमणी प्रभाकर धाकडे यांच्या बुद्ध-भीम गीताने झाली. समारोप राष्ट्रगीताने झाला. (प्रतिनिधी)
तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल - रामदास आठवले
यावेळी रामदास आठवले म्हणाले, कोणी कितीही मोठे मोर्चे काढले तरी अॅट्रॉसिटी कायद रद्द होणार नाही. अॅट्रॉसिटी ह अन्याय करणारा कायदा नसून रक्षण करणारा कायदा आहे. हा कायदा रद्द करण्याची वेळ आलीच तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे यावेळी त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांना, बुद्धाला आणि संविधानाला मानतात. त्यामुळे संविधान कधीच बदलणार नाही. संविधान बललले तर देश बदलेल. दीक्षाभूमीची जागा आता कमी पडू लागली आहे. तेव्हा स्मारक समितीला हवी तितकी जागा सरकारने द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी केली. तसेच सध्या मी केंद्रात तीन वर्ष मंत्री आहे, त्यामुळे स्मारक समितीला जे काही हवे असेल ते त्यांनी मागावे मी देईल, असेही सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत काही कविताही सादर केल्या.