‘गर्दी’साठी निरीक्षकांचा वॉच
By Admin | Updated: April 9, 2016 03:07 IST2016-04-09T03:07:50+5:302016-04-09T03:07:50+5:30
भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतर्फे गुरुवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित ‘नैतिकतेचा शंखनाद’ कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नाही.

‘गर्दी’साठी निरीक्षकांचा वॉच
काँग्रेस नेत्यांची परीक्षा : विधानसभानिहाय होणार मोर्चाचे चित्रीकरण
कमलेश वानखेडे नागपूर
भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतर्फे गुरुवारी कस्तूरचंद पार्कवर आयोजित ‘नैतिकतेचा शंखनाद’ कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी झाली नाही. त्यामुळे आता कस्तूरचंद पार्कवर ११ एप्रिल रोजी आयोजित काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेला गर्दी होईल की नाही याची धास्ती काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सभेला लोक जमविण्यासाठी विधानसभानिहाय नेत्यांना ‘टास्क’ देण्यात आला असून आकडा दिला तेवढे लोक संबंधित नेत्याने आणले की नाही याची खातरजमा करण्यासाठी विधानसभानिहाय निरीक्षक नेमण्यात आले आहेत. भाजपसारखे आपले हसू होऊ नये याची चिंता काँग्रेसला सतावत आहे.
अ.भा. काँग्रेस समितीतर्फे ११ एप्रिल रोजी कस्तूरचंद पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी या सभेच्या तयारीसाठी नागपुरात तीनवेळा आढावा बैठका घेतल्या. त्यावेळी स्थानिक नेत्यांनी ‘दस हजार, बीस हजार’ असे आकडे दिले. संबंधित नेत्यांच्या नावासमोर त्यांनी दिलेले आकडे लिहून एक यादी तयार करण्यात आली आहे. आता संबंधित नेते खरच एवढे लोक आणतात का, याची खातरजमा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने काही जणांवर विशेष जबाबदारी सोपविली असून पक्षात याची कमालीची गुप्तता पाळली जात आहे. नागपूर शहरातील सहा व ग्रामीण मधील सहा विधानसभा मतदारसंघातील लोकांनी सभेला येण्यासाठी शहरात कुठे गोळा व्हायचे याचे ‘पॉईंट’ ठरवून देण्यात आले आहेत.
राहुल यांचा मुक्काम, सराफांना भेटणार
सभेनंतर सोनिया गांधी दिल्लीला परत जातील, तर राहुल गांधी यांच्या मुक्कामाची शक्यता वर्तविली जात आहे. सराफा व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला समर्थन द्यावे व आमची मागणी केंद्र सरकारकडे मांडावी, या मागणीसाठी सराफा व्यापाऱ्यांनी राहुल गांधी यांची वेळ मागितली आहे. काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सराफा व्यापाऱ्यांना भेटीची वेळ मिळण्याची शक्यता असून त्यासाठी राहुल गांधी नागपुरात मुक्काम करणार आहेत. एसपीजीला शुक्रवारी तसे निरोप आले आहेत.