बुकींच्या निवासस्थान व प्रतिष्ठानाची तपासणी : अन्य शहरातील बुकींशी हितसंबंध

By Admin | Updated: July 15, 2015 03:33 IST2015-07-15T03:33:34+5:302015-07-15T03:33:34+5:30

क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या उपराजधानीतील एका नामांकित बुकीचे रामदासपेठेतील निवासस्थान आणि गांधीबाग येथील ...

Inspection of bookies and establishments in Buchi: Bookie's interest in other cities | बुकींच्या निवासस्थान व प्रतिष्ठानाची तपासणी : अन्य शहरातील बुकींशी हितसंबंध

बुकींच्या निवासस्थान व प्रतिष्ठानाची तपासणी : अन्य शहरातील बुकींशी हितसंबंध

ईडीची नागपुरातही धडक
नागपूर : क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या उपराजधानीतील एका नामांकित बुकीचे रामदासपेठेतील निवासस्थान आणि गांधीबाग येथील व्यावसायिक प्रतिष्ठानावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अन्वेषण विभागाने मंगळवारी धाड टाकली. बुकीच्या दोन्ही ठिकाणांवर सकाळी १० वाजता एकाचवेळी ही कारवाई सुरू झाली. कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. धाडीची माहिती देण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
धाडीची कारवाई सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील प्रत्येकी सहा सदस्यीय दोन चमूने केली. न्या. आर.एम. लोढा कमिटीने मंगळवारी दिलेल्या निर्णयाशी संबंधित ही धाड असल्याचे बोलले जात आहे. या समितीने चेन्नई सुपर किंग (सीएसके) आणि राजस्थान रॉयल (आरआर) क्रिकेट टीमवर दोन वर्षांसाठी बंदी टाकली, शिवाय या दोन्ही चमूचे मालक गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या भारतीय प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यावर आजन्म बंदी टाकली. न्या. लोढा हे मुंबईत भरगच्च पत्रपरिषदेत समितीचा निर्णय जाहीर करीत होते तर दुसरीकडे ‘ईडी’चे अधिकारी नागपुरात धाडीची कारवाई करीत होते.
नागपुरातील बुकी हा नामांकित सट्टाकिंग आहे. मुंबई, इंदूर, दिल्ली, कानपूर, कोलकाता आणि देशातील अन्य शहरातील बुकींसोबत त्याचे हितसंबंध आहेत. या बुकीने मध्य भारतात सट्ट्याच्या माध्यमातून येणारा पैसा गोळा करण्यासाठी आपले एजंट नेमले आहेत. त्याचे नेटवर्क ओडीआय, आयपीएल आणि २०-टष्ट्वेन्टी सामन्यादरम्यान सक्रिय असते. सामनेच नव्हे तर स्पॉट फिक्सिंवरही ते सट्टा खातात.
या व्यवसायातील अन्य बुकींनी सांगितले की, हे एजंट छोट्या शहरातील ग्राहकांकडून खायवाडी करून नागपुरातील या बुकीकडे नोंद (उतारी) करतात. नागपुरातील बुकीला जोखीम वाटली तर तो अन्य शहरातील मोठ्या बुकींकडे येथील सट्ट्याची नोंद करतो. बुकीचा हा व्यवसाय मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले मोबाईल फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून करतात. पण पैशाची देवाणघेवाण ही नेहमीच हवालाच्या माध्यमातून करण्यात येते. सामन्याचा निर्णय येताच पैज लावणाऱ्याला त्वरित भुगतान केले जाते. या अवैध धंद्यामध्ये विश्वासार्हता येण्यासाठी प्रत्येक सौद्याचे भुगतान अतिशय प्रामाणिकपणे केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Inspection of bookies and establishments in Buchi: Bookie's interest in other cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.