नागपूर जिल्ह्यात किडीचा प्रादुर्भाव; शेतकरी कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:23 AM2019-11-06T11:23:07+5:302019-11-06T11:25:43+5:30

अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, दमट वातावरण व धुके यामुळे कपाशी, धान व मिरचीच्या तसेच भाजीपाल्याच्या पिकांवर किडींसोबतच बुरशीजन्य (फंगल) व ‘बॅक्टेरियल’ रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

Insect outbreak in Nagpur district; The farmers in trouble | नागपूर जिल्ह्यात किडीचा प्रादुर्भाव; शेतकरी कोलमडला

नागपूर जिल्ह्यात किडीचा प्रादुर्भाव; शेतकरी कोलमडला

Next
ठळक मुद्देदमट वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव महागड्या कीटकनाशकांमुळे उत्पादन खर्च वाढणार

सुनील चरपे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परतीच्या मोसमी वाऱ्याचा बरसलेला पाऊस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा ठरला. कारण या पावसामुळे खरीप व भाजीपाल्याची पिके सडली आहेत. त्यातच अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, दमट वातावरण व धुके यामुळे कपाशी, धान व मिरचीच्या तसेच भाजीपाल्याच्या पिकांवर किडींसोबतच बुरशीजन्य (फंगल) व ‘बॅक्टेरियल’ रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यातून पिकांना वाचविण्यासाठी महागड्या कीटक, जीवाणू व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागणार असल्याने या पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. दुसरीकडे, प्रत खालावल्याने बाजारात कमी मिळणारा भाव लक्षात घेता या किडी पिके पोखरत असल्याने शेतकरी कोलमडला आहे.
पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा व मक्याच्या कणसातील दाण्यांना तसेच बोंडांमधील कापसातील सरकीला अंकुर फुटले आहे. सोयाबीन व मका कुजल्याने शेतकऱ्यांच्या घरी या दोन्ही पिकांचा दाणाही आला नाही, अशी माहिती नरखेड येथील शेतकरी मदन कामडे यांनी दिली. कपाशीचा अत्यंत महत्त्वाचा पहिला ‘फ्लॅश’चा कापूस भिजल्याने खराब झाला. दुसऱ्या ‘फ्लॅश’ची बोंडं गळाली असून, ढगाळ व दमट वातावरण आणि धुक्यामुळे कपाशीवर ‘फंगल’ व ‘बॅक्टेरियल’ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बोंडं गळतीचे प्रमाण वाढले असून, ती काळी पडायला सुरुवात झाली आहे. यातून कपाशीचे पीक वाचविण्यासाठी महागडी बुरशी व जीवाणूनाशक अ‍ैषधांची फवारणी करणे आवश्यक असून, ती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे, अशी माहिती अमोल पांडे, रा. पाटणसावंगी (ता. सावनेर) यांनी दिली.
काही शेतातील धानाचे पीक आडवे झाले असून, काही शेतांमध्ये धानावर रस शोषण करणाऱ्या तुडतुड्यांचा तसेच करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कापणी केलेल्या शेतात पाणी साचून असल्याने धानाच्या लोंब्या सडण्याची शक्यताही बळावली आहे. प्रतिकूल वातावरणामुळे मिरचीवर ‘डायबॅक’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती नांद (ता. भिवापूर) येथील शेतकरी श्रेयस जयस्वाल यांनी दिली. हा रोग झपाट्याने पसरत असून, मिरचीची झाडे वाळत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच मिरचीवर चुरडा, मुरडा व शेंडेमर या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ‘चुरडा’मध्ये झाडाची पाने चुरडली जात असून, ‘मुरडा’मध्ये पाने चुरडून उलटी होतात. ‘माईटस्’ नामक किडींमुळे हा रोग होत असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले. शिवाय, ‘शेंडेमर’मध्ये अळी शेंडा पोखरत असल्याने झाडाची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडून गळतात. त्यामुळे झाडे अल्पावधीतच सुकायला सुरुवात होते.
या किडींचा प्रादुर्भाव दमट व ढगाळ वातावरण आणि धुक्यांमुळे झाला आहे. अतिवृष्टीतून बचावलेल्या पिकांची शेतकऱ्यांनी योग्य निगा घेत मशागतीवर खर्चही केला. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे काही पिके पूर्णपणे हातची गेल्यात जमा असून, काही पिके वाचवायची म्हटली तर त्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. पावसामुळे पिकांची प्रत खालावल्याने बाजारात त्यांना फारसा चांगला भाव मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करा
पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रमाण विचारात घेता, त्यांचे काटेकोर सर्वेक्षण व पंचनामे करणे प्रशासकीय यंत्रणेला नियोजित काळात शक्य नाही. राज्य शासन बहुतांश बाबींमध्ये ‘हायटेक’ प्रणालीचा वापर करते. मात्र, त्यात शेती क्षेत्र अपवाद ठरले आहे. कर्मचाऱ्यांची कमी संख्या, त्यांच्यावरील कामाचा ताण, सर्वेक्षणाला लागणारा वेळ व त्यातील अचूकपणा लक्षात घेता, शासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण ‘ड्रोन’द्वारे करायला हरकत नाही. जिल्ह्यात गावठाणाचे मोजमाप करण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर केला आहे. ‘ड्रोन’मुळे वेळ, मनुष्यबळ व पैसा याची बचत होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांनी दिली.

यंत्रणा तोकडी
जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेने पावसामुळे झालेल्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे करायला सुरुवात केली आहे. ही कामे कृषी, महसूल व पंचायत विभागाच्या संयुक्त विद्यमाने केली जातात. पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान जिल्हाभर आहे. तालुका पातळीवरील या तिन्ही विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यांच्या दिमतीला अतिरिक्त कर्मचारीही दिले जात नाही. याच कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व पंचनामे करावे लागत असल्याने त्यांना ते नियोजित काळात पूर्ण करणे शक्य नाही. तोकड्या प्रशासकीय यंत्रणेमुळे नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण व योग्य पद्धतीने तसेच प्रामाणिकपणे होईलच असे नाही, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

Web Title: Insect outbreak in Nagpur district; The farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी