सौर ऊर्जेचे अर्ज बाद ठरिवण्याची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 10:32 IST2021-07-22T10:31:55+5:302021-07-22T10:32:45+5:30
Nagpur News सोलर रुफ टॉपच्या(सौर ऊर्जा) अर्जांना कुठलेही कारण न देता बाद ठरविणाऱ्या प्रकाराची आता महावितरणकडून चौकशी करण्यात येणार आहे.

सौर ऊर्जेचे अर्ज बाद ठरिवण्याची होणार चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोलर रुफ टॉपच्या(सौर ऊर्जा) अर्जांना कुठलेही कारण न देता बाद ठरविणाऱ्या प्रकाराची आता महावितरणकडून चौकशी करण्यात येणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अर्जदारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांना सबसिडी प्रदान केली जाते. परंतु या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महावितरणच्या स्वीकृत एजन्सीकडूनच सोलर रूफ टॉप लावणे आवश्यक आहे. महावितरणच्या नियमांवर काम करणे कठीण आहे, असे एजन्सीजचे म्हणणे आहे. अशा स्थितीत एजन्सी काम तर करत आहे, मात्र सोलर रूफ टॉप लावावे लागू नये यासाठी अर्ज बाद करण्यात येत आहेत. कुणी दबाव टाकला तर दोन पट अधिक किंमत सांगितली जात आहे. सोलर रूफ टॉप संदर्भात एजन्सीजकडून गैरप्रकार सुरू असल्याची बाब लोकमतने समोर आणली होती. यानंतर महावितरणचे अधिकारी सक्रिय झाले. बुधवारी बकरी ईदची सुटी असतानादेखील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अर्जदारांशी संपर्क केला. काही घरांना भेटी देखील दिल्या. कुठल्याही ग्राहकावर अन्याय होणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. यादरम्यान पराग पांढरीपांडे, प्रकाश अग्रवाल, विठ्ठल वसाडे, मधू सुरी यांनी देखील त्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती दिली. काही जणांनी तर सबसिडी न घेताच सोलर रूफ टॉप लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मास्माचे सूर्यमित्र देखील मैदानात
सौरऊर्जा व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या मास्माने देखील नागरिकांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूर्यमित्र तैनात करण्यात आले आहेत. हे लोक सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांशी संपर्क करून त्यांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतील, असे मास्माचे सचिव साकेत सुरी यांनी सांगितले.