एफसी गोवाचा खेळाडू तलांग निलंबित
मडगाव : अ.भा. फुटबॉल महासंघाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून मुंबई सिटी एफसीविरुद्ध आयएसए सामन्यात धोकादायक खेळ करणारा एफसी गोवा संघाचा खेळाडू रिडीम तलांग याच्यावर एका सामन्याची बंदी घातली. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात तलांगने प्रतिस्पर्धी खेळाडूला जोडा मारून खाली पाडले होते. या आरोपात तो दोषी आढळला. नंतर त्याने माफी मागितली
लिव्हरपूल, पोर्तो संघांचे विजय
पॅरिस : माजी विजेता लिव्हरपूल आणि पोर्तो संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या बाद फेरीत धडक दिली. दुसरीकडे विक्रमी १३ वेळा जेतेपद पटकविणाऱ्या रियाल माद्रिदला मात्र शखतार दोनेत्सककडून 0-२ ने पराभवाचा धक्का बसला. यामुळे माद्रिदला साखळीतच बाहेर पडावे लागू शकते. जिनेदीन जिदानचा हा संघ बचावफळीच्या हाराकिरीमुळे मंगळवारी पराभूत झाला.
मायकेल स्नीडन बनले न्यूझीलंडचे प्रमुख
वेलिंग्टन : माजी खेळाडू मायकेल स्नीडन यांनी न्यूझीलंड क्रिकेटचे नवे प्रमुख म्हणून आयसीसी चेअरमन बनलेले ग्रेग बार्कले यांचे स्थान घेतले. स्नीडन हे १९९० ते ९२ आणि ९९ ते २००१ व २०१३ पासून आतापर्यंत सीईओ तसेच बोर्ड सदस्य होते. त्यांनी २५ कसोटी आणि ९३ वन डेत देशाचे प्रतिनिधित्व केले. आयसीसी बोर्डात ते देशाचे प्रतिनिधी राहतील.
कमरेच्या दुखापतीने मिशेल स्टार्क बाहेर
कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क हा कमरेच्या तसेच बरगडीच्या दुखापतीमुळे बुधवारी भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वन डेत खेळू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यातदेखीत तो त्रस्त होता. त्याला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे कर्णधार ॲरोन फिंच याने नाणेफेकीच्यावेळी सांगितले. डेव्हिड वाॅर्नर दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर आहे.