ओबीसी तरुणीवर अन्याय? पोलीस आयुक्तांना नोटीस; पोलीस शिपाई भरतीचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 19:51 IST2021-11-19T19:51:25+5:302021-11-19T19:51:53+5:30
Nagpur News जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये एका ओबीसी तरुणीला खुल्या प्रवर्गात संधी नाकारण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

ओबीसी तरुणीवर अन्याय? पोलीस आयुक्तांना नोटीस; पोलीस शिपाई भरतीचे प्रकरण
नागपूर : जिल्हा पोलीस शिपाई भरतीमध्ये एका ओबीसी तरुणीला खुल्या प्रवर्गात संधी नाकारण्यात आल्यामुळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व नागपूर पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे, तसेच यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कुमुद नासरे असे पीडित तरुणीचे नाव असून, ती नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथील रहिवासी आहे. कुमुदच्या अर्जातील माहितीनुसार, जिल्हा पोलीस, लोहमार्ग पोलीस व कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी संयुक्त जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यापैकी जिल्हा पोलीस शिपाई भरतीत ओबीसी आरक्षण नव्हते; परंतु उमेदवारांना या तिन्ही भरतीसाठी एकच अर्ज देण्यात आल्याने व प्रवर्ग नमूद करण्याकरिता वेगवेगळे रकाने नसल्यामुळे कुमुदने तिन्ही विभागासाठी ओबीसी प्रवर्गातून अर्ज सादर केला होता.
त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये तिने १०० पैकी ७४ गुण मिळविले. दरम्यान, जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी खुल्या प्रवर्गामध्ये ६३ व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले. कुमुदला ही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे तिने न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. कायद्यानुसार, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नोकरी दिली जाऊ शकते, असे तिचे म्हणणे आहे. कुमुदतर्फे ॲड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.