मिहान-सेझमध्ये इन्फोसिसचे कार्यान्वयन एप्रिलमध्ये होणार
By Admin | Updated: February 4, 2017 02:41 IST2017-02-04T02:41:50+5:302017-02-04T02:41:50+5:30
मिहान-सेझमध्ये आयटी क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस कंपनीने पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण केले आहे.

मिहान-सेझमध्ये इन्फोसिसचे कार्यान्वयन एप्रिलमध्ये होणार
पतंजलीचा लीज करार दोन दिवसांत : एचसीएलचे बांधकाम सुरू
नागपूर : मिहान-सेझमध्ये आयटी क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस कंपनीने पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण केले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटकरिता एप्रिलपर्यंत २५० जणांची भरती करण्यात येणार असून सध्या १०० जणांची भरती केली आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. कंपनीने विकास आयुक्ताकडे सॉफ्टवेअर निर्यातीच्या मंजुरीसाठी कर्ज केल्याची माहिती आहे.
मिहान-सेझमध्ये टीसीएसनंतर काम सुरू करणारी इन्फोसिस ही दुसरी कंपनी आहे. कंपनीने १४२ एकर जागा घेतली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) बैठकीत दबाव आणल्यानंतर कंपनीने काम सुरू केले होते. प्रारंभी २५० अभियंत्यांना घेऊन कंपनी काम सुरू करणार आहे. त्यानंतर पुन्हा भरती करणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे भूमिपूजन करताना कंपनीने १४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा दावा केला होता. पहिल्या टप्प्यात ४ हजार जणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण तीन वर्षांनंतर कंपनीचे कार्य सुरू करताना प्रारंभी केवळ २५० सॉफ्वेअर अभियंत्यांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.(प्रतिनिधी)
पतंजलीचे काम लवकरच
पतंजलीने अविकसित फूड पार्कमध्ये ६९ कोटींच्या गुंतवणुकीतून २३४ एकर जागा तसेच विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) ७४ कोटींच्या गुंतवणुकीतून १०६ एकर जागा विकत घेतली आहे. या जागांचा लीज करार दोन ते तीन दिवसांत होणार आहे. त्यानंतर कंपनी बांधकाम सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनी एक हजार कोटींच्या गुंतवणुकीतून सर्वात मोठा हर्बल पार्क बनविणार आहे. या पार्कमध्ये लागणारा कच्चा माल विदर्भातील शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे. त्याचा फायदा विदर्भातील जवळपास ५० हजार शेतकऱ्यांना होईल, शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच कंपनीतर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एचसीएलचे काम सुरू
एचसीएल कंपनीने सेझमध्ये ५० एकरवर बांधकाम सुरू केले आहे. कंपनीने पूर्वी १०४ एकर जागेची मागणी केली होती. या कंपनीत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.