इन्फोसिसचे १५० कोटींचे निर्माण कार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:12+5:302021-06-16T04:10:12+5:30

वसीम कुरैशी नागपूर : लॉकडाऊननंतर मिहानमध्ये आयटी कंपनी इन्फोसिसने १५० कोटींच्या गुंतवणुकीतून ३ लाख चौरस फूट जागेवर भव्य इमारतीचे ...

Infosys starts construction work worth Rs 150 crore | इन्फोसिसचे १५० कोटींचे निर्माण कार्य सुरू

इन्फोसिसचे १५० कोटींचे निर्माण कार्य सुरू

वसीम कुरैशी

नागपूर : लॉकडाऊननंतर मिहानमध्ये आयटी कंपनी इन्फोसिसने १५० कोटींच्या गुंतवणुकीतून ३ लाख चौरस फूट जागेवर भव्य इमारतीचे काम सुरू केले आहे. बांधकाम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार असून २०२३ पासून कंपनीत दोन हजार नवीन रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) इन्फोसिसने पाच वर्षांपूर्वी १४२ एकर जागा खरेदी केली होती. कंपनीने चार वर्षांत ५५ हजार चौरस फूट जागेवर बांधकाम केले आहे. येथे जवळपास ५०० आयटी प्रोफेशनल कार्यरत आहेत. कंपनी एकूण ९.५ लाख चौरस फूट जागेवर ४७५ कोटींच्या गुंतवणुकीतून बांधकाम करणार होती. पण पाच वर्षांनंतरही एकूण अपेक्षित बांधकाम आणि गुंतवणुकीच्या ५० टक्के काम करीत आहे. पूर्ण बांधकामानंतर येथे ५ हजार सॉफ्टवेअर प्रोफेशनन्सला काम मिळेल, असे कंपनीने पूर्वी म्हटले होते. परंतु सध्याच्या बांधकामामुळे २०२३ मध्ये दोन हजार युवक-युवतींना नोकरी मिळणार आहे.

३६ कंपन्यांचे बांधकाम ठप्प

मिहानच्या विकासाचे दावे अनेक वर्षांपासून करण्यात येत आहेत. पण विविध प्रकल्पांना गती मिळण्यासाठी शासनाने कुठलाही पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मिहानमध्ये सकारात्मक बदल दिसून येत नाही. याच कारणांमुळे काही वर्षांपूर्वी मिहानमध्ये जमीन घेतल्यानंतरही ३६ कंपन्यांनी अजूनही बांधकाम सुरू केलेले नाही. यामध्ये लहान प्लॉट मिळविणाऱ्या ३० कंपन्या आणि मोठे भूखंड खरेदी करणाऱ्या सहा कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन बांधकाम सुरू करण्यावर एमएडीसीचे अधिकारी भर देत आहेत.

Web Title: Infosys starts construction work worth Rs 150 crore