कोरोनाकाळात महागाईचा तडका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:04+5:302021-05-13T04:08:04+5:30
नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून ...

कोरोनाकाळात महागाईचा तडका !
नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून गहू व तांदळाची आवक बंद असल्याने स्थानिक बाजारात किमती अतोनात वाढल्या आहेत. यासोबतच भाज्या व फळांच्या किमतींतही वाढ झाली आहे. पुरवठा कमी होत असल्याने किराणा दुकानदारांनाही मालाच्या किमती वाढविल्या आहेत. संकटसमयी उत्पन्न कमी झाले असताना महागाईने नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी आहे.
खाद्यतेल व धान्य महागले
खाद्यतेल, धान्य आणि डाळींच्या दरवाढीचा फटका गरीब व सामान्यांना बसत आहे. सोयाबीन तेल १६० रुपये किलो. तूरडाळ ११० रुपये, एमपी बोट गहू २८ ते ४० रुपये, तांदूळ दर्जानुसार ३५ ते ६० रुपये किलो आहे. एमपी बोट गव्हाचे भाव आवकीअभावी अचानक वाढले आहेत. देशात बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने मालाची आवक कमी आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात माल येत नाही.
भाज्या, फळांच्या किमतीत वाढ
भाजी बाजारात टोमॅटो, कच्चे आंबे, लिंबूकरिताही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ‘व्हिटॅमिन सी’ची मागणी वाढल्याने लिंबू, कच्चे आंबे, मोसंबी जास्त दरात विकली जात आहेत. एक वा दोन रुपयांना मिळणारे लिंबू आता पाच रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव ४० रुपयांवर गेले आहे. साप्ताहिक बाजार बंद असल्याने शहरात रस्त्याच्या कडेला सकाळी ८ ते ११ पर्यंत बाजार भरतो. या बाजारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळते. याशिवाय ईदमुळे फळांची मागणी वाढली आहे. सफरचंद, पपई, मोसंबी या फळांच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. सफरचंद २२० रुपये किलो आहे. मोसंबी १३० रुपये किलो, पपई ५० रुपये किलो विकली जात आहेत. टरबूज आणि खरबूजची आवक चांगली असल्याने भाव आटोक्यात आहेत.
ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, काही किराणा दुकानदारांनी साठेबाजी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अतोनात वाढविल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. साठेबाजांवर नियंत्रण आणण्यास मालाच्या किमती कमी होतील; पण अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. मुख्यत्वे अर्थव्यवहार हे मुख्य कारण असू शकते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले आहे. अशा संकटकाळात व्यापाऱ्यांनी अतिरिक्त नफा कमवू नये, असे पांडे म्हणाले.