सावनेर/उमरेड/कुही/कळमेश्वर/हिंगणा/काटोल/ रामटेक/मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांत ३९६५ चाचण्यांपैकी १६४ (४.१३ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १,४१,७३८ इतकी झाली आहे. यातील १,३५,९९७ कोरोनामुक्त झाले, तर २२८४ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०५३ इतकी आहे.
कुही तालुक्यात १३१ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात मांढळ, वेलतूर, साळवा व तितूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात ४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात २, तर ग्रामीण भागात गोंडखैरी व खापरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
सावनेर तालुक्यात १६ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील दोन, तर ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात ८ रुग्णांची नोंद झाली. यात उमरेड शहरातील दोन, तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे.
काटोल तालुक्यात २२५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील २ रुग्ण, तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्राअंतर्गत १, तर येनवा केंद्राअंतर्गत मोडणाऱ्या गावात ४ रुग्णांची नोंद झाली. रामटेक तालुक्यात दोन रुग्णांची नोंद झाली. यात शहर आणि ग्रामीणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६५१२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ६३०६ कोरोनामुक्त झाले, तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०६ इतकी आहे.
मोदा तालुक्यात एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ४६५० रुग्णांची नोंद झाली असून, यातील ४४८८ कोरोनामुक्त झाले. सध्या ६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगण्यात ग्राफ घसरला
हिंगणा तालुक्यात कोरोना संक्रमणाचा ग्राफ घसरला आहे. तालुक्यात २१८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत पाचजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात डिगडोह येथे २, तर वानाडोंगरी, टेंभरी, इसासनी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११,८७६ इतकी झाली आहे. यातील ११,०१९ कोरोनामुक्त झाले, तर २७८ रुग्णांचा मृत्यू झाला.