विशेष समिती सभापतींना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:06+5:302021-03-14T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या विशेष समितीचे तीन सभापती कोविड संक्रमणात सापडले आहेत. विशेष म्हणजे या सभापतींनी पदभार ...

विशेष समिती सभापतींना कोरोनाची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या विशेष समितीचे तीन सभापती कोविड संक्रमणात सापडले आहेत. विशेष म्हणजे या सभापतींनी पदभार स्वीकारल्यानंतर बैठका घेतल्या, दौरा केला. यात आरोग्य सभापती महेश महाजन, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे व जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई आदींचा समावेश आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हेसुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मनपात पदाधिकाऱ्यांवर काेरोना हल्ला झाल्याची चर्चा आहे. सभापतींची निवडणूक झाल्यानंतर आरोग्य सभापती महाजन यांनी महापौर दयाशंकर तिवारी व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली क्वारंटाइन सेंटरचा दौरा केला होता. सुमारे दहा दिवसांपूर्वी ते पॉझिटिव्ह आले होते. तेव्हापासून ते होम क्वारंटाइन आहेत. तसेच स्थापत्य समिती सभापती सोनकुसरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवस ते कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी आपले कार्यालय बंद ठेवले. त्यांनी आपल्या कक्षाच्या दारावरच सूचना लावली की ते पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई पॉझिटिव्ह आलेत. मागील दहा दिवसांत तीन सभापती व विरोधी पक्षनेते पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी आपले कार्यालय बंद ठेवले. यामुळे मनपात खळबळ उडाली आहे. पदाधिकारी पॉझिटिव्ह येत असले तरी कार्यक्रमांचा मोह कमी झालेला दिसत नाही. धार्मिक कार्यक्रम, उद्घाटन, भूमिपूजन असे कार्यक्रम सुरू आहेत. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना निर्बंध घालण्यात आले आहे. अगामी निवडणुका विचारात घेता पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचा अट्टाहास सुरू आहे.