बालपणीचे प्रेम आंधळे आणि बहिरेही !
By Admin | Updated: July 15, 2015 03:39 IST2015-07-15T03:39:19+5:302015-07-15T03:39:19+5:30
बालपणीचे प्रेम आंधळे असते, अशी प्रेमवीरांच्या दुनियेतील एक म्हण आहे. प्रेम आंधळे तर असतेच शिवाय बहिरेही असते,

बालपणीचे प्रेम आंधळे आणि बहिरेही !
एमडी पत्नी आणि बीएस्सी पतीचे वैवाहिक नाते संपुष्टात
कौटुंबिक न्यायालयाचा निकाल
राहुल अवसरे नागपूर
बालपणीचे प्रेम आंधळे असते, अशी प्रेमवीरांच्या दुनियेतील एक म्हण आहे. प्रेम आंधळे तर असतेच शिवाय बहिरेही असते, अशी प्रचिती कौटुंबिक न्यायालयातील एका घटस्फोटाच्या प्रकरणाने आली. प्रेमविवाह करून एका एमडी पत्नीने आणि बीएस्सी पतीने मांडलेला संसार काही काळातच विस्कटला. प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांच्या न्यायालयाने पत्नीची घटस्फोटाची याचिका मंजूर करून पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध संपुष्टात आल्याचा निकाल दिला.
शांतिदुताच्या वर्धेत या दोघांचे बालपण गेले. याचिकाकर्ती १९९८-९९ या काळात दहाव्या वर्गात शिकत असताना तिने एका शाळेत मुख्याध्यापक असलेल्या प्रतिवादीच्या वडिलांकडे शिकवणी वर्ग लावले होते. त्यामुळे तिचे प्रतिवादीच्या घरी येणे-जाणे होते. दोघेही समवयस्क होते. दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. २००३-०४ या काळात प्रतिवादी हा बीएस्सी शिकत असताना दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. तथापि याचिकाकर्तीच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. विरोध झुगारून त्यांनी मित्रमंडळीच्या उपस्थितीत ५ डिसेंबर २००६ रोजी हिंदू वैदिक पद्धतीने प्रेमविवाह केला होता. विवाह समारंभात दोघांचेही नातेवाईक नव्हते. १७ फेब्रुवारी २००७ रोजी त्यांनी रीतसर विवाह नोंदणी केली होती. विवाहानंतर याचिकाकर्ती ही आपल्या आईवडिलांकडेच राहत होती.
चार वर्षांपासून दोघांमध्ये दुरावा
नागपूर : ४ मार्च २००७ ते फेब्रुवारी २००८ पर्यंत या दोघांचे वैवाहिक संबंध होते. त्यावेळी तिने आपले एमबीबीएस पूर्ण केले होते. इन्टर्नशिप करीतच तिने एमडीची तयारी सुरू केली होती. एमडीच्या पहिल्या फेरीसाठी ती सर्वात आधी ती नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी नागपूरच्या इंदिरा गाधी वैद्यकीय महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला होता.
ती येथील वसतिगृहात राहत होती. प्रतिवादीने वर्धेत आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र तो वारंवार नागपुरात येऊन याचिकाकर्तीसोबत राहायचा. मार्च २०११ पासून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. दरम्यान तिने आपले एमडी पूर्ण केले तर प्रतिवादीने बीएस्सी, बीए, बीएड् आणि एमबीए केले. याचिकाकर्तीनुसार ती स्वत:च्या आर्थिक खर्चाचा भार स्वत:च सांभाळत होती. उलट पतीला महिन्याला चार-पाच हजार रुपये द्यायची. (प्रतिनिधी)
पतीने फेटाळले आरोप
प्रतिवादीने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपल्या सासू-सासऱ्याने आपणास कधीही जावई समजले नाही. त्यांना आपल्या पत्नीचा विवाह ओळखीच्या डॉक्टरसोबत करून द्यायचा आहे. आपण पत्नीसोबत संसारास तयार आहोत. परंतु आपली पत्नी आपल्या आई-वडिलांच्या दबावात आहे. आपल्या पत्नीची याचिका फेटाळून पर्जुरीची कारवाई केली जावी, अशी विनंती प्रतिवादीने न्यायालयाला केली होती.दोन्ही बाजूंच्या वकिलांचाही न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेऊन याचिका मंजूर करीत पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध संपुष्टात आल्याचा निवाडा दिला.