कुख्यात गुंडाने केली गुंडाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST2021-02-05T04:48:58+5:302021-02-05T04:48:58+5:30
हसनबागमध्ये थरार - आरोपी सलमान पोलिसांच्या ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २० वर्षांपूर्वी नागपूरच्या गुन्हेगारी जगतात प्रचंड दरारा ...

कुख्यात गुंडाने केली गुंडाची हत्या
हसनबागमध्ये थरार - आरोपी सलमान पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २० वर्षांपूर्वी नागपूरच्या गुन्हेगारी जगतात प्रचंड दरारा असलेला कुख्यात गुंड समशेर खान याच्या मुलाने सोमवारी हसनबागमध्ये एका गुंडाची हत्या केली. अल्ताफ अशफाक शेख असे मृताचे नाव असून तो कळमन्यातील रहिवासी होता. तर, आरोपीचे नाव सलमान खान समशेर खान पठाण (वय २४) आहे. तोसुद्धा कुख्यात गुंड आहे.
आरोपी सलमान खानचा बाप समशेर याची नागपुरात दोन दशकांपूर्वी प्रचंड दहशत होती. गुंड भावांसोबत त्याची एक मोठी टोळी होती. प्रतिस्पर्धी टोळींकडून समशेरवर अनेकदा हल्ले झाले. समशेरचा भाऊ गफ्फार कालूची एका बिल्डरने १० वर्षांपूर्वी सुपारी देऊन हत्या केली. त्याचे सर्व अवैध धंदेही बंद झाले. वृद्धत्वामुळे आणि आर्थिक कोंडीमुळे समशेरवर शेजारीही हल्ले करू लागल्याने त्याचा दरारा संपला. त्याचा मुलगा सलमान अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याने यापूर्वी एकावर प्राणघातक हल्ला चढवला होता. हाणामारी, लुटमारी, चोऱ्यातही तो सक्रिय होता. त्याच्याविरुद्ध तडीपारी आणि एमपीडीएची कारवाईसुद्धा करण्यात आली होती. गेल्या वर्षी तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर उमरेडला राहायला गेला. तेथून महिनाभरापूर्वीच पुन्हा नागपुरात राहायला आला.
काही दिवसांपासून त्याचे कळमन्यातील अल्ताफसोबत वैर वाढले होते. अल्ताफही तडीपार गुंड होता. तो कळमन्यातून हसनबागमध्ये एका महिलेकडे यायचा. सलमानला ते खटकत होते. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास शेषनगरात एका इमारतीजवळ हे दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर आरोपी सलमानने जवळचा चाकू काढून अल्ताफवर सपासप घाव घातले. अल्ताफ जीवाच्या धाकाने पळत सुटला असता आरोपी सलमानने त्याला दुसऱ्या ठिकाणी गाठून त्याची हत्या केली. या घटनेमुळे हसनबागमध्ये प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवनचे ठाणेदार सांदिपान पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. नंतर पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांनीही नंदनवन ठाण्यात भेट दिली. पोलिसांनी काही वेळेतच आरोपी सलमानला सक्करदरा परिसरातून ताब्यात घेतले.
अल्ताफने शिवीगाळ केल्यामुळे त्याची हत्या केल्याचे आरोपी सलमान पोलिसांना सांगत आहे. त्याच्या या कथनावर पोलिसांना विश्वास नाही. हत्येमागे अनैतिक संबंधाचे कारण असावे, असा संशय आहे. पोलीस तपास करीत आहेत.
---
तीन दिवसांपूर्वीच पत्नीची डिलीव्हरी
आरोपी सलमानच्या पत्नीने ३ दिवसांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला असून ती सध्या रुग्णालयात आहे. तिच्या देखभालीत त्याचे कुटुंबीय गुंतले आहेत. अशात सलमान प्रतिस्पर्धी गुंडाची हत्या करून कोठडीत पोहोचला आहे.