लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोचे मुंबईहून शनिवारी सकाळी 7.35 वाजता नागपुरात येणारे विमान दुसऱ्या प्रयत्नात 15 मिनिटांनंतर लँडिंग झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ अहमदाबाद विमान दुर्घटनेची आठवण ताजा झाली.
इंडिगो कंपनीचे मुंबई-नागपूर 6इ 5349 हे विमान सकाळी 7.35 नागपूर विमानतळावर लँडिंग होणार होते. कमी दृश्यतेमानतेमुळे हे विमान वैमानिक पहिल्या प्रयत्नात धावपट्टीवर उतरवू शकले नाही. विमानात झालेल्या घोषणेनुसार विमान वेळेत धावपट्टीवर उतरले नाही, पण काहीच सेकंदात विमान पुन्हा आकाशात झेपावल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विमानाने काही मिनिटे आकाशात घिरट्या घातल्यानंतर जवळपास 15 मिनिटांनी सकाळी 7.50 वाजता विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले.
यादरम्यान, नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ संचालक आबीद रुही यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तसेच इंडिगो कंपनीच्या नागपूर विमानतळाचे वरिष्ठ व्यवस्थापक स्वप्निल साने यांनी मला या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले.