अॅक्सिस बँकेचे अशोक गौतम यांचे मत : सीआरआर दरकपातमुळे उत्साहनागपूर : ब्राझिल, रशिया, इंडिया, चीन आणि दक्षिण अफ्रिका (ब्रिक्स) या विकसनशील देशांच्या समूहात भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दर सर्वाधिक असल्याने जगात भारत गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण असल्याचे मत अॅक्सिस बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष ग्लोबल मार्केट हेड अशोक गौतम यांनी येथे व्यक्त केले.अशोक गौतम यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची लोकमत भवनात भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लोकमत मीडिया समूहाच्या वरिष्ठ संपादकांशी संवाद साधला. अन्य देशांच्या १ ते ४ टक्के जीडीपी दराच्या तुलनेत भारतात जीडीपी दर ६ ते ७ टक्के समाधानकारक असा आहे. एवढा दर गाठणारा भारत जगात एकमेव आहे. मंदीच्या टप्प्यातून संपूर्ण जग बाहेर निघत असताना भारत एकटाच एका रात्रीतून ९ टक्के जीडीपी दर गाठू शकत नाही. त्यासाठी काही कालावधी लागेल, असे ते म्हणाले.गौतम म्हणाले, ब्रीक्स देशांमध्ये भारताचा जीडीपी दर सर्वाधिक आहे, यावर शंका घेण्याचे काहीच कारण नाही. त्याच कारणामुळे भारत गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण आहे. भारताच्या प्रगतीची कॉर्पोरेट जगताने नोंद घेणे सुरू केले आहे आणि ही सकारात्मक चिन्हे आहेत. रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, चलनवाढीचा दर निरंतर खाली येत होता आणि तो अपेक्षित मर्यादेपर्यंत खाली आला. त्यात करेक्शन येणे स्वाभाविक होते. बँकर्सला रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात होण्याची अपेक्षा होती. पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो रेटमध्ये ०.५० टक्के कपात करून सुखद धक्का दिला.एवढेच नव्हे तर जगात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने तेलाच्या आयातीवरील खर्चही कमी झाला. हे सकारात्मक संकेत आहेत. रेपो रेटमध्ये कपात झाल्यामुळे बाजारपेठेत विश्वास वाढला असून त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्साह संचारेल, असा विश्वास असल्याचे मत अशोक गौतम यांनी व्यक्त केले. विजय दर्डा यांनी गौतम यांना राज्यसभेतील भाषणांचे संग्रहण असलेले ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ आणि ‘सीधी बात’ ही आपली दोन पुस्तके भेटस्वरूपात दिली. चर्चेदरम्यान अॅक्सिस बँकेच्या नागपूर सर्कलचे उप-उपाध्यक्ष पुनीत सहगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भारत गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण
By admin | Updated: October 8, 2015 03:00 IST