अमेरिकेत जपली भारतीय परंपरा; ‘टीचर्स’ना गुरुवंदनेतून नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 10:42 IST2021-07-27T10:41:37+5:302021-07-27T10:42:59+5:30
Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत एचएसएसतर्फे (हिंदू स्वयंसेवक संघ) अमेरिकेतील ७३ शहरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवांचे आयोजन करण्यात आले.

अमेरिकेत जपली भारतीय परंपरा; ‘टीचर्स’ना गुरुवंदनेतून नमन
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत एचएसएसतर्फे (हिंदू स्वयंसेवक संघ) अमेरिकेतील ७३ शहरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचे संकट कायम असल्याने कुठे ऑनलाइन, तर कुठे ऑफलाइन पद्धतीने गुरुवंदना करण्यात आली व तेथील शिक्षकांना सन्मानितदेखील करण्यात आले. तेथील शिक्षकांना यानिमित्ताने भारतीय परंपरेचे दर्शन घडले.
गुरुपौर्णिमेनिमित्त एचएसएसतर्फे दरवर्षीच अंतर्गत स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व त्यात प्रामुख्याने एनआरआय सहभागी होतात. अमेरिकेत मे महिन्याचा पहिला आठवडा हा शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच आठवड्यातील पहिला मंगळवार हा राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो. यालाच भारतीय परंपरेने पुढे नेत गुरुवंदनेचे आयोजन केले होते. २४ प्रांतांमधील ७३ शहरांत एकूण ९९ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही शहरात एकाहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले. यादरम्यान सुमारे १७०० शिक्षकांना भारतीय परंपरेनुसार सन्मानित करण्यात आले.
ऑनलाइन आयोजनातदेखील उत्साह
कोरोनामुळे अनेक शहरात एचएसएसच्या बहुतांश शाखांनी ऑनलाइन आयोजन केले. मुलांनी शिक्षकांसाठी शुभेच्छापत्र व भेटवस्तू तयार केल्या. अमेरिकेतील शिक्षकांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्यात आले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी श्लोकांच्या माध्यमातून गुरुवंदना केली.