नागपूर : अतिवादाचा विचार हा जगाचा स्वभाव आहे.म्हणून सृष्टीवर संकट ओढवले आहे. सृष्टी चालवण्यासाठी धर्म आवश्यक आहे. भारतवर्ष जगात केवळ धर्मासाठी जिवंत आहे. म्हणून भारतवर्षाचे अस्तित्व हे नित्य आहे. हिंदू ही भारताची अभिन्न ओळख असून भारतीयता, मानवता व बंधूभाव म्हणजेच हिंदू होय. तेव्हा भारतातील सर्व समाज एकरूप होऊन चालले तर भारत विश्वगुरू झाल्याचे पाहायला मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केला.हिंदू धर्म संस्कृती मंदिर धंतोली यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप गुरुवारी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडला. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अरुण लखानी अध्यक्षस्थानी होते. हिंदू धर्म संस्कृती मंदिरचे अध्यक्ष बापू भागवत, उपाध्यक्ष वंदना लखानी महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर होते. यावेळी अमृत कुंभ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, धर्म व संस्कृती हा भारताचा शब्द आहे. भारतात जे विदेशी आले, त्यांनी या शब्दांचा योग्य अनुवाद केलेला नाही. ‘रिलिजन’ हा मूळ रिलीजिओ या लॅटीन शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ बांधून ठेवणे असा होता. धर्माचा हा अर्थ होऊ शकत नाही. सर्वांना जोडणारा, प्रारंभ, मध्य व शेवटही चांगला म्हणजे धर्म होय. भारतात प्राचीन काळापासून सदासर्वदा देश व समाजाच्या उत्थानासाठी धर्माचे आचरण हेच सांगितले गेले आहे. संविधानातही विविधतेतही एकता हीच सांगितली गेली आहे. जितकी मते आहेत तितके पथ आहेत. परंतु पथ वेगवेगळे असले तरी अनुभुती एक आहे. तेव्हा पंथ वेगवेगळे असू शकतात. परंतु त्यांचा उद्देश एकच असतो. विज्ञानही याच निष्ठेने बनलेले आहे आज आपण धर्म हा विज्ञाननिष्ठ आहे का, यावर चर्चा करतो. परंतु उद्या विज्ञान हे धर्माधिष्ठित आहे की नाही, यावर विचार करावा लागेल, त्याची सुरुवात झालेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.अरुण लखानी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या वेगाने धावणाऱ्या तंत्र युगात भारतीय संस्कृती हीच मार्गदर्शक ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला.मंगेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले.
तर भारत विश्वगुरू झाल्याचे पाहायला मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:46 IST
अतिवादाचा विचार हा जगाचा स्वभाव आहे.म्हणून सृष्टीवर संकट ओढवले आहे. सृष्टी चालवण्यासाठी धर्म आवश्यक आहे.
तर भारत विश्वगुरू झाल्याचे पाहायला मिळेल
ठळक मुद्देमोहन भागवत : हिंदू ही भारताची अभिन्न ओळख