स्वतंत्र विदर्भाची घेतली शपथ
By Admin | Updated: August 2, 2015 03:04 IST2015-08-02T03:04:59+5:302015-08-02T03:04:59+5:30
‘स्वतंत्र विदर्भ हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी शपथ घेत

स्वतंत्र विदर्भाची घेतली शपथ
विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पुढाकार : वीज बिलाची केली होळी
नागपूर : ‘स्वतंत्र विदर्भ हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी शपथ घेत विदर्भवाद्यांनी शनिवारी स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्धार केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे १ आॅगस्ट हा दिवस विदर्भ निर्धार दिवस म्हणून पाळण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्हेरायटी चौक गांधी पुतळा सीताबर्डी येथे आयोजित कार्यक्रमात विदर्भ निर्धाराची शपथ घेण्यात आली. तसेच वीज बिलाची सार्वजनिक होळी करून लोडशेडिंग व वीज बिलातील दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
विदर्भात कोळसाआधारित जी वीज प्रकल्पात तयार होते त्यापैकी केवळ १/३ वीज विदर्भाला दिली जाते. उर्वरित २/३ वीज विदर्भाबाहेर पाठविली जाते. सध्या असलेल्या वीज प्रकल्पामुळे चंद्रपूर हे शहर देशातील ४ थे तर राज्यातील पहिल्या नंबरचे प्रदूषित शहर बनले आहे. त्यामुळे दमा, कॅन्सरसारख्या आजाराला जनता बळी पडत आहे. तसेच विदर्भात वीज तयार होत असतानाही पुन्हा १८ तासाचे लोडशेडिंग सुरू झाले आहे. त्यामुळे हा विदर्भावर अन्याय असून या अन्यायाचा विरोधात नागपूरसह विदर्भातील ११ ही जिल्ह्यांमध्ये आंदोलन करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. या आंदोलनांतर्गत २.५० रुपये प्रति युनिट वीज बिल घेण्यात यावे, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. याप्रसंगी राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले,राजकुमार तिरपुडे, दिलीप नरवडिया, महादेवराव नखाते, सुधीर पालीवाल, अरुण केदार, श्याम वाघ, निखील भुते, विष्णू आष्टीकर, राजेश श्रीवास्तव, अण्णाजी राजेधर, धर्मराज रेवतकर, अनिल तिडके, विदर्भ कनेक्टचे अॅड. मुकेश समर्थ यांच्यासह तिरपुडे महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)