विदर्भ विकासासाठी स्वतंत्र राज्याचीच गरज
By Admin | Updated: October 11, 2015 03:17 IST2015-10-11T03:17:07+5:302015-10-11T03:17:07+5:30
विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे.

विदर्भ विकासासाठी स्वतंत्र राज्याचीच गरज
बीआरएसपी लढा उभारणार :
कस्तूरचंद पार्कवर नेत्यांचा निर्धार
नागपूर : विदर्भ हा अनेक गोष्टींमध्ये मागासलेला आहे. रोजगार, कुपोषण आणि नक्षलवादी समस्यांनी ग्रस्त आहे. या समस्या आजही कायम आहेत. त्या केवळ विदर्भाचा विकास झाला नाही म्हणून. यातच शेतकरी आत्महत्यांनी तर विदर्भाच्या जखमा जागतिक पातळीवर पोहोचल्या आहेत. तेव्हा विदर्भाचा सर्वांगीण विकास हा स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा आम्ही तीव्रतेने लढणार आणि तो यशस्वीही करून दाखविणार, असा एल्गार बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) नेत्यांनी शनिवारी कस्तूरचंद पार्कवर केला.
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कांशीराम यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त कस्तूरचंद पार्कवर संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘विदर्भातील शेतकरी युवा बेरोजगार, महिला व कामगारांच्या समस्या स्वतंत्र विदर्भ राज्य : समर्थक -विरोधकांच्या भूमिका व उपाय’ या विषयावर जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुरेश माने उपस्थित होते.
सिद्धार्थ पाटील म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आजवर अनेक आंदोलने झालीत. परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही. कारण प्रत्येक आंदोलन हे प्रामाणिकपणे लढलेच गेले नाही. पक्षातून विस्थापित झाल्यावर स्थापित होण्यासाठीच विदर्भ आंदोलनाचा वापर आजवर विविध नेत्यांनी आपापल्यापरीने केला. जोपर्यंत आंबेडकरी समाजासह एकूणच दलित, आदिवासी व मुस्लीम समाज या आंदोलनात सहभागी होत नाही, तोपर्यंत विदर्भाचे आंदोलन हे यशस्वी होऊच शकत नाही हे वास्तव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात किशोर गजभिये यांनी विदर्भातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत विदर्भात विविध क्षेत्राचा बॅकलॉग आकडेवारीसह सादर करीत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी हे आंदोलन लावून धरेल आणि आपण स्वतंत्र विदर्भ घेऊच, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल अन्विकर यांनी संगीतमय प्रबोधन केले. याप्रसंगी अहमद कादर, भूपेंद्र रायपुरे, तौफिक मौलवी, सर्वजित बनसोडे, रमेश जनबंधू आदींनीही मार्गदर्शन केले. समशेर खा पठाण, सुनील खोब्रागडे, असलम खान, विजय तायडे, चेतन पेंदाम, मिलिंद अहीरे, राजेश बोरकर आदी उपस्थित होते. संचालन अॅड. मिलिंद मेश्राम यांनी केले. विशेष फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)