एका निर्भयाने भर न्यायालयात आरोपीच्या श्रीमुखात हाणल्या
By Admin | Updated: December 19, 2015 02:52 IST2015-12-19T02:52:49+5:302015-12-19T02:52:49+5:30
बलात्काराचा खटला सुरू असताना शुक्रवारी एका पीडित मुलीने भरगच्च न्यायालयात आरोपीं बसण्याच्या बाकाजवळ जाऊन एका आरोपीच्या श्रीमुखात दोन-तीन हाणल्या.

एका निर्भयाने भर न्यायालयात आरोपीच्या श्रीमुखात हाणल्या
नागपूर : बलात्काराचा खटला सुरू असताना शुक्रवारी एका पीडित मुलीने भरगच्च न्यायालयात आरोपीं बसण्याच्या बाकाजवळ जाऊन एका आरोपीच्या श्रीमुखात दोन-तीन हाणल्या. या घटनेने संपूर्ण जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली. आरोपीला हीच खरी शिक्षा असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्ष घटना पाहणारे न्यायालय कक्षातील प्रेक्षक व्यक्त करीत होते.
बलात्काराची ही घटना तीन वर्षांपूर्वी २ एप्रिल २०१२ रोजी उमरेड ‘कोल माईन्स’ भागात घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ही १३ वर्षांची होती. प्रतापसिंग लहरी हा या प्रकरणातील आरोपी आहे. तो कोल माईन्समध्ये चांगल्या हुद्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. ते दलित आहेत. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी ही आपल्या दोन-तीन मैत्रिणींसोबत जात असताना प्रतापसिंग याने मोटरसायकलने त्यांचा पाठलाग केला होता. त्यावेळी प्रतापासिंग याच्यासोबत ‘नट्टू’ नावाचा आणखी एक मित्र होता. त्यावेळी पीडित मुलगी प्रतापसिंगच्या तावडीत सापडून तिच्या सर्व मैत्रिणी घाबरून पळून गेल्या होत्या. प्रतापसिंग याने जबरदस्तीने पीडित मुलीला कोलमाईन्स भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून प्रतापसिंग आणि नट्टू या दोघांना अटक केली होती. बलात्काराची ही घटना दूरगामी परिणाम करणारी ठरली. घटनेपासून तिचे शाळेत जाणे बंद झाले. (प्रतिनिधी)
‘तुने मेरी जिंदगी खराब की है’
पीडित मुलगी ही साक्ष देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी झाली. अतिरिक्त सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी या मुलीची सर तपासणी साक्ष नोंदवून घेतली. ‘तुम्ही न्यायालयात बसून असलेल्या आरोपींना ओळखता काय?’ असा प्रश्न करताच होय म्हणत ती आरोपी बसून असलेल्या बाकाजवळ गेली. तिने ‘तुने मेरी जिंदगी खराब की है’, असे म्हणत आरोपी प्रतापसिंग याच्या थोबाडीत जोरजोराने दोन-तीन थापडा मारल्या. त्यामुळे आरोपीचा चष्मा तुटून पडला. या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. उपस्थित पोलिसांनी वाघिणीसारख्या चवताळणाऱ्या या मुलीला शांत केले होते. बाहेर हीच खरी शिक्षा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.