सेवानिवृत्त जवानांना मिळणार वाढीव भत्ता
By Admin | Updated: May 27, 2015 03:06 IST2015-05-27T03:06:45+5:302015-05-27T03:06:45+5:30
महापालिकेच्या अग्निशमन विभागात उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आलेल्या सेवानिवृत्त जवानांना वा त्यांच्या वारसांना वाढीव भत्ता थकबाकीसह ...

सेवानिवृत्त जवानांना मिळणार वाढीव भत्ता
नागपूर : महापालिकेच्या अग्निशमन विभागात उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आलेल्या सेवानिवृत्त जवानांना वा त्यांच्या वारसांना वाढीव भत्ता थकबाकीसह देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.
राष्ट्रपती पदकप्राप्त जवानांना सेवेत असताना, निवृत्तीनंतर वा त्यांच्या वारसांना प्रतिमाह भत्ता १५०० मंजूर आहे. परंतु गेल्या सहा वर्षांपासून महापालिका या जवानांना वा त्यांच्या कुटुंबीयांना दीड हजाराऐवजी दरमहा शंभर रुपये देत होती. दरम्यान केंद्र सरकारने २५ मार्च २०१५ पासून भत्त्यात वाढ क रून दरमहा ३००० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार १५ जुलै २००९ ते २४ मार्च २०१५ पर्यंतची थकबाकी व त्यानंतर दरमहा ३००० रुपयेप्रमाणे वाढीव भत्ता देण्यात येणार आहे.
आगीच्या दुर्घटनेतून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे तत्कालीन अग्शिमन विभागाचे प्रमुख अधिकारी दिवंगत सुशीलकुमार सोनक यांच्या पत्नी शीला सोनक, सेवानिवृत्त स्थानाधिकारी देवीसिंग चंदेल, सुरेश तळेकर आदींना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. परंतु या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना वा त्यांच्या वारसांना अतिरिक्त शंभर रुपये भत्ता दिला जात होता.
या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर सुधारित वाढीव भत्ता देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली.(प्रतिनिधी)