इंदला जंगलात उष्माघाताने मोराचा मृत्यू
By Admin | Updated: June 18, 2014 01:24 IST2014-06-18T01:24:08+5:302014-06-18T01:24:08+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंदला जंगलात एका मोराचा उष्माघाताने मृत्यू झाला. मोराच्या शवविच्छेदन अहवालावरून ही बाब सिद्ध झाली. उन्हाळ्यातील प्रचंड तापमान वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी

इंदला जंगलात उष्माघाताने मोराचा मृत्यू
वैभव बाबरेकर - अमरावती
वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इंदला जंगलात एका मोराचा उष्माघाताने मृत्यू झाला. मोराच्या शवविच्छेदन अहवालावरून ही बाब सिद्ध झाली. उन्हाळ्यातील प्रचंड तापमान वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी घातक ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
११ जून रोजी इंदला येथील जंगलातील कोरड्या नाल्यात एक मोर अत्यवस्थ स्थितीत असल्याची माहिती गावकऱ्यांनी वडाळी वनविभागातील अधिकाऱ्यांना दिली. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांच्यासह वनरक्षकांनी ताबडतोब इंदलाच्या जंगलात जाऊन पाहणी केली.
अत्यवस्थ अवस्थेतील मोराला विषबाधा झाल्याची शंका प्रथम वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आली. मोराला लगेच उपचाराकरिता पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी औषधोपचार करुन त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले. मात्र, दुसऱ्या दिवशी मोराची प्रकृती बघण्याकरिता वनविभागाचे अधिकारी गेले असता रात्री त्या मोराचा मृत्यू झाल्याचे कळले. मोराच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या मोराचे शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदन अहवालात मोराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यंदाच्या उन्हाळ्यात ४७ डिग्रीच्या वर गेलेल्या तापमानामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांचे प्रचंड हाल झाले. चिमण्या दगावल्या. मात्र, उष्माघाताने मोराचा मृत्यू होण्याची घटना प्रथमच उघडकीस आली आहे.