गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढतेय

By Admin | Updated: November 7, 2014 00:44 IST2014-11-07T00:44:15+5:302014-11-07T00:44:15+5:30

‘कॉन्ट्रासेप्टिव्हज ओरल’ म्हणजे गर्भधारणा राहू नये म्हणून तोंडातून घेण्यात येणाऱ्या औषधांची शहरात खुलेआम विक्री होत आहे. विशेष म्हणजे, किशोरवयीन मुलींमध्ये या गोळ्यांचा वापर वाढला आहे.

Increasing sales of contraceptive pills | गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढतेय

गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री वाढतेय

दररोज दोन हजारांच्यावर गोळ्यांची खरेदी
नागपूर : ‘कॉन्ट्रासेप्टिव्हज ओरल’ म्हणजे गर्भधारणा राहू नये म्हणून तोंडातून घेण्यात येणाऱ्या औषधांची शहरात खुलेआम विक्री होत आहे. विशेष म्हणजे, किशोरवयीन मुलींमध्ये या गोळ्यांचा वापर वाढला आहे. शहरातील विविध मेडिकल स्टोअर्सवर दररोज किमान दोन हजाराच्यावर गोळ्यांची खरेदी होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. अतिकाळजीपोटी तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. यात विवाहितांसोबतच अविवाहित युवतींचे प्रमाणही लक्षणीय आहे. यामागे ‘अनवॉन्टेड ७२’, ‘आयपील’ या गोळ्यांच्या अधिक प्रमाणातील जाहिरातींचा प्रभाव जाणवत आहे. जाहिरातींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ शकत असल्याचा दावा केला असल्याने, मेडिकल स्टोअर्सवर सहज उपलब्ध होत आहेत.
गोळ्यांच्या विक्रीतून मिळणारा नफा मोठा
एका औषध विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, शासनाच्या शेड्यूल ‘एच’ आणि ‘एक्स’ या नियमांना कात्री लावून काही औषधे विक्री केली जाऊ शकतात. गोळ्यांच्या जाहिरातींवरच जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येऊ शकत असल्याची प्रसिद्धी होत असेल तर, मागणी करणाऱ्यांना दुकानदारही कशाला नाही म्हणतील; शिवाय ८० ते १०० रुपये किंमत असल्याने त्यातून मिळणारा नफाही मोठाच आहे. परंतु या गोळ्यांचे बिल मागितल्यास डॉक्टरांची चिठ्ठी आम्ही मागतो, असेही ते म्हणाले.
प्रिस्क्रीप्शनशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री
असुरक्षित यौनसंबंधातील त्रुटींसाठी इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांची निर्मिती झाली. डॉक्टरांना न विचारता सर्रास अशा गोळ्यांचा वापर केला जातो. डॉक्टरांकडून प्रिस्क्रीप्शनमध्ये खूपच कमी लिहिल्या जाणाऱ्या गोळ्यांची प्रत्यक्ष विक्री मात्र जास्त आहे.
घ्यावयाची काळजी
गर्भनिरोधक गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. अतिकाळजीपोटी अनेक गोळ्यांचा वापर टाळावा. इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्या या फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापराव्यात. सततच्या गोळ्यांनी गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शारीरिक संबंधानंतर ७२ तासांत घ्यावयाच्या गोळ्यांनी १०० टक्के गर्भधारणा थांबतेच असे नाही. कोणत्याही औषधाचे अतिसेवन घातकच असते. (प्रतिनिधी)
गर्भनिरोधक साहित्याच्या विक्रीवर बंधन नाही
गर्भनिरोधकासाठी वापरण्यात आलेल्या साहित्य व गोळ्यांच्या विक्रीवर बंधन नाही. परंतु गर्भपाताच्या गोळ्यांचा ‘शेड्यूल एच’मध्ये समावेश होतो. अशा गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय वितरित केल्या जाऊ नये, असा नियम आहे.
अशोक गिरी,
सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन
गर्भनिरोधक गोळ्यांचा ‘मिसयूज’ वाढला
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स या वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायला हव्यात. या गोळ्यांचा ‘मिसयूज’ वाढला आहे. या गोळ्या अधिक प्रमाणात सेवन केल्यास हार्मोन्स इनबॅलेन्स होऊ शकतो. सोबतच पाळी अनियमित होण्याचीही शक्यता अधिक असते. यामुळे पुढे जाऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
डॉ. लक्ष्मी श्रीखंडे
प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ

Web Title: Increasing sales of contraceptive pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.