समाजात जातीयवाद वाढतोय
By Admin | Updated: October 1, 2014 00:50 IST2014-10-01T00:50:39+5:302014-10-01T00:50:39+5:30
सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल.

समाजात जातीयवाद वाढतोय
स्व. भा. ल. भोळे स्मृती व्याख्यान : अमर हबीब यांचे प्रतिपादन
नागपूर : सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल. अलीकडे पूर्वीपेक्षा आंतरजातीय विवाह वाढले आहेत. परंतु त्याचवेळी जातीवादही वाढला आहे. सामाजिक बदलातील हा तिढा आज सोडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भा. ल. भोळे स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामाजिक बदलांचे नवे संदर्भ’ या विषयावर मंगळवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. मंचावर आधार संस्थेचे अविनाश रोडे व विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे रमेश बोरकुटे उपस्थित होते. शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
हबीब पुढे म्हणाले, सध्या समाजात जो हा बदल घडत आहे. त्यामागे तशीच कारणेही आहेत. पूर्वी शेती हा कुटुंबाचा व्यवसाय होता. संयुक्त कुटुंब पद्घती होती. त्या स्थितीत आंतरजातीय विवाह कठीण होते. परंतु अलीकडे कामाचे स्वरूप बदलले आहे.
तरुण-तरुणी एकत्र काम करू लागले आहेत. यातून त्यांना जोडीदार निवडण्याच्या संधी मिळत आहे. आणि म्हणूनच आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. मात्र याचा अर्थ जातीयवाद कमी झाला असे म्हणता येणार नाही. जातीयवादी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यांना आपली माणसे हातून जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ते त्यांना हाताशी धरून ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु त्याचवेळी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जाती, धर्म नष्ट करण्यासाठी अनुकूल वातावरणही तयार होऊ लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक शोषणाविषयी बोलताना, त्यांनी नवनिर्मिती करणारा हा नेहमीच शोषित राहिला असल्याचे ते म्हणाले. साहित्यातून नवनवीन कल्पना पुढे आल्या पाहिजे. परंतु अलीकडे या क्षेत्राला शिक्षिकी पेशाची वाळवी लागली असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणातून सध्या एकिकडे देशाचा विकास होत आहे, पण दुसरीकडे समाज चळवळीचाही विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)