स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढतेय
By Admin | Updated: October 31, 2014 00:48 IST2014-10-31T00:48:09+5:302014-10-31T00:48:09+5:30
देशात १९८२-८३ मध्ये कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे.

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढतेय
नागपुरात ३२ टक्के : दरवर्षी दगावतात ७० हजार महिला
नागपूर : देशात १९८२-८३ मध्ये कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता मात्र मागील ३० वर्षात यात बदल झाला आहे. हा कर्करोग जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. राज्याचा विचार केला तर मुंबईत हे प्रमाण ३३ टक्के असून विदर्भ दुसऱ्या स्थानी आहे. एकट्या नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे. वेळीच निदान हे या मृत्यूला रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याची माहिती आॅन्कॉलॉजिस्ट डॉ. सुशील मंधानिया यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात नोव्हेंबर महिना हा स्तनाच्या कर्करोगाची जागृती करण्यासाठी पाळला जातो. त्या निमित्ताने डॉ. मंधानिया यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, देशात दर २२ महिलांमध्ये एकीला स्तनाचा कर्करोग होतो. जगभरात दरवर्षी १ कोटी १० लाख महिला स्तनाच्या कर्करोगाने दगावतात. त्यापैकी २३ टक्के महिला एकट्या भारतातील आहेत. जगाच्या क्र मवारीत स्तनाच्या कर्करोगाने दगावणाऱ्यांमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकन स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आठ मध्ये एका महिलेला आहे. एकट्या भारतापुरता विचार करायचा तर दरवर्षी १३ लाख महिला कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. त्यापैकी ५ लाख महिलांचा वेळीच निदान न झाल्याने अकाली मृत्यू ओढवतो. एकट्या विदर्भात दर एक लाख महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असलेल्या १५०० नव्या रु ग्णांची भर पडत आहे. नागपुरात हे प्रमाण ३२ तर वर्धेत २६ टक्के आहे. पुण्यातील दर एक महिलांमध्ये २३ टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग कवेत घेतो. स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीम देखील वाढते. त्यामुळे वयाची साठी गाठलेल्या महिलांनी वर्षातून किमान एकदा मेमोग्राफी करून घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)