बुबुळाच्या अंधत्वाचे प्रमाण वाढतेय
By Admin | Updated: August 25, 2014 01:17 IST2014-08-25T01:17:58+5:302014-08-25T01:17:58+5:30
जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे.

बुबुळाच्या अंधत्वाचे प्रमाण वाढतेय
अशोक मदान यांची माहिती : उद्यापासून नेत्रदान पंधरवडा
नागपूर : जीवनसत्व ‘अ’ची कमी, अपघात, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, अनुवांशिक आजार, मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर आणि जंतु संसर्गामुळे बुबुळाला इजा पोहचून अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी अशा तीस हजार रुग्णांची भर पडत आहे. नागपुरातील एकट्या मेडिकल रुग्णालयात दरवर्षी ६० नवे रुग्ण आढळून येत आहेत. बुबुळाचे प्रत्यारोपण करून हे अंधत्व टाळता येते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) नेत्र विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी येथे दिली.
नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकलच्यावतीने २५ आॅगस्टपासून पंधरवडा पाळला जाणार आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, अंधत्व हे केवळ मोतीबिंदूमुळेच येते असे नाही, तर डोळयांना होणाऱ्या विविध आजारांमुळेही अंधत्व येऊ शकते. पारदर्शक पटल अपारदर्शक होणे हा आजार कोणत्याही वयाच्या म्हणजेच लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. डोळ्यांचे अपघात, डोळे येणे, अ-जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे, डोळ्यात कचरा किंवा रासायनिक पदार्थ गेला असल्यास इत्यादींमुळे पारदर्शक पटल खराब झाल्यास अंधत्व येऊ शकते. यावर बुबुळ प्रत्यारोपण करून अंधत्व दूर करता येते. परंतु भारतात दरवर्षी सुमारे ७५ लाख लोक मृत होऊनही फक्त पन्नास हजार नेत्रदान होतात. यातही फक्त १५ हजार बुबुळाचे प्रत्यारोपण होणे शक्य होते. याला कारण नेत्रदानाविषयी योग्य माहिती व जागरूकतेचा अभाव आहे. चांगली दृष्टी असणे हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे, ही काळाची गरज आहे. मरणोत्तर नेत्रदान करून अंध व्यक्तीच्या जीवनातील अंध:कार दूर करण्याचे पवित्र काम प्रत्येक जण करू शकतो.
आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोेळ्याचा उपयोग दुसऱ्या अंध व्यक्तीला जग पाहण्यासाठी होत असेल, तर जगातून जाताना दोन अंध व्यक्तींना दृष्टीची अमूल्य भेट द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेत डॉ. दिलीप कुमरे व डॉ. मोना देशमुख उपस्थित होत्या.
२२५ नेत्रपेढ्यांमधून ५१ सुरू
राज्यात २२५ नेत्रपेढ्या आहेत, परंतु ५१ पेढ्या बंद आहेत. एकट्या नागपुरातील पाच बंद आहेत. मे २०१३ ते जून २०१४ या दरम्यान बुबुळ प्रत्यारोपणाच्या फक्त ६९ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
नेत्रदानाची ही चळवळ राबविण्यासाठी शासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे नेत्ररोग विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)