खासगी रुग्णालयात वाढला संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:18+5:302021-07-04T04:06:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूरपू : मार्चपासून नागपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यापासून यात मोठी वाढ ...

खासगी रुग्णालयात वाढला संसर्गाचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूरपू : मार्चपासून नागपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल महिन्यापासून यात मोठी वाढ झाली. यामुळे शहरातील बायोमेडिकल वेस्टमध्ये सरासरीच्या तुलनेत जवळपास चौपट वाढ झाली आहे. वर्षांपूर्वी शहरात दररोज ७०० ते ९०० किलो निघणारा कचरा आता ३ हजार किलोवर गेला आहे. शहरातील खासगी रुग्णालयातील जैविक कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेने खासगी कंपनीकडे सोपविली आहे. परंतु या कंपनीकडून दररोज कचरा उचलला जात नाही. काही रुग्णालयात सात-आठ दिवस हा कचरा पडून राहत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.
महापालिकेने नागपूर शहरातील खासगी रुग्णालयातील जैविक कचरा उचलण्याची जबाबदारी सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीकडे दिली आहे. हा जैविक कचरा उचलण्याचा भावही चांगलाच वधारला आहे. एक किलो कचरा उचलण्यासाठी खासगी रुग्णालयांना तब्बल १०० रुपये मोजावे लागत असल्याची माहिती आहे. परंतु मनुष्यबळ कमी असल्याने कंपनीची गाडी दररोज कचरा उचलण्यासाठी येत नसल्याची माहिती खासगी रुग्णालयांनी दिली. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, खासगी रुग्णालयातील जैविक कचरा उचलण्याची जबाबदारी खासगी एजन्सीकडे दिल्याचे सांगण्यात आले.
रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर कॉटन, इंजेक्शन, प्लास्टर, बॅण्डेज, सिरिंज, उपचार करताना वापरण्यात आलेल्या वस्तू आदींचा बायोमेडिकल वेस्टमध्ये समावेश होतो. परंतु कोरोनामुळे यात भर पडली आहे. नागपूर शहरात वर्षभरापूर्वी ७०० ते ९०० किलो जैविक कचरा निघत होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा कचरा सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास १ हजार ५०० किलोपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर पहिली लाट ओसरण्याला सुरुवात झाली, परंतु मार्च २०२१ मध्ये पुन्हा दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या सात हजारावर गेली. कोरोना
रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच जैविक कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दररोज ३,००० ते ३,५०० किलो जैविक कचरा निघत होता. आता तो काही प्रमाणात कमी झाला. हा कचरा उचलण्यासाठी १०० रुपये दर गृहित धरला, तर दररोज तीन लाख रुपये रुग्णालयांना मोजावे लागत आहेत.
भांडेवाडीत विल्हेवाट
हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांचा विचार करता, प्रत्येक रुग्णामागे ३५० ते ४०० ग्रॅम बायोवेस्ट निघणे अपेक्षित आहे. शहरातील बायोवेस्टची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. यावर मनपाचे नियंत्रण आहे. शहरातील हॉस्पिटलमधील बायोवेस्टची भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे विल्हेवाट लावली जाते. विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून यावर प्रक्रिया केली जाते.