सात दिवसांपासून उभ्या ट्रेलरमुळे वाढल्या समस्या
By Admin | Updated: July 8, 2015 02:49 IST2015-07-08T02:49:29+5:302015-07-08T02:49:29+5:30
शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे कसा बट्ट्याबोळ होतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चिंचभवन मार्गावरील साईन बोर्डमध्ये अडकलेला आणि मोठ्या मशीन असलेला ट्रेलर आहे.

सात दिवसांपासून उभ्या ट्रेलरमुळे वाढल्या समस्या
अपघाताची शक्यता : प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष
नागपूर : शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे कसा बट्ट्याबोळ होतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चिंचभवन मार्गावरील साईन बोर्डमध्ये अडकलेला आणि मोठ्या मशीन असलेला ट्रेलर आहे. हा ट्रेलर मागील सात दिवसांपासून येथे अडकलेला असून यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. एअरपोर्ट ते बुटीबोरी मार्गावर वाहनांची या ट्रेलरशी टक्कर होण्याची शक्यता असून हा ट्रेलर सात दिवसांपासून येथे कशामुळे उभा आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
एअरपोर्ट नंतर वर्धा मार्गावर १ जुलैला सायंकाळी एक मोठा ट्रेलर गेला. हा ट्रेलर छत्तीसगडचा असून त्यावर इस्पात कंपनीची मोठी मशीन आहे. हा ट्रेलर पुलावरून गेल्यानंतर चालकाच्या लक्षात आले की समोरील साईन बोर्डातून हा ट्रेलर जाणे शक्य नाही. तरीसुद्धा चालकाने या ट्रेलरला इतक्या जवळ नेले की मशीन आणि साईन बोर्ड एकमेकांना छेदल्या गेले. या ट्रेलरच्या मागे एक अजून ट्रेलर असून त्यावरही तशीच मशीन ठेवलेली आहे. आता चालकाला वाटले तरी तो या ट्रेलरला रस्त्यावर जागा नसल्यामुळे मागे घेऊ शकत नाही.
ट्रेलरच्या चालकाने पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की, रस्त्यावर सर्व ठिकाणी २५ फुटांचे साईन बोर्ड लावण्यात येतात. त्या खालून मोठ्या मशीन आरामाने जाऊ शकतात.
परंतु येथील साईन बोर्ड फक्त १९ फुटांच्या उंचीवर आहे. पीडब्ल्यूडीवाल्यांनी त्यास आरटीओकडे पाठविले. आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी चालकास सांगितले की, एक साईन बोर्डला तात्काळ हटविले तरी सुद्धा पुढे बुटीबोरीपूर्वी आणखी तीन साईन बोर्ड आहेत. हे साईन बोर्ड मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लावण्यात आले आहेत.
त्यामुळे हा ट्रेलर बेवारस पडला आहे. तेथे ट्रेलरचा चालक आणि वाहतूक पोलीसही नाहीत. तेथून वाहन जाताना वाहनचालकांना अचानक हा ट्रेलर पुढे दिसतो. रस्त्यावर कमी उंचीचे साईन बोर्ड लावण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चालकाची चुकी असली तरीसुद्धा ट्रेलर हटविण्यासाठी नागपुरातील विविध विभागाचे अधिकारी काय करीत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादा ट्रेलर सात दिवसांपासून एकाच ठिकाणी उभा राहावा एवढे प्रशासन सुस्त झाल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)