-तर ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार
By Admin | Updated: March 21, 2017 01:53 IST2017-03-21T01:53:32+5:302017-03-21T01:53:32+5:30
ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीनिहाय संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून,

-तर ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार
पाणीटंचाईबाबतची मंजूर कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करा : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश
नागपूर : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीनिहाय संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, ज्या गावात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होईल अशा गावांमध्ये आराखड्यानुसार तसेच अतिरिक्त उपाययोजनांद्वारे ३० एप्रिलपूर्वी संपूर्ण कामे पूर्ण करून पाणी पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
तसेच पाणीटंचाई आराखड्यानुसार आवश्यकतेनुसार खासगी विहीर अधिग्रहण व टँकरद्वारा पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, अशा उपाययोजनांसंदर्भात दोन दिवसात प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल. तसेच मंजूर आराखड्यानुसार कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांच्या सेवापुस्तकात नोंद घेऊन दोन वेतनवाढी थांबविण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीण तसेच हिंगणा तालुक्यातील पाणी पुरवठा आढावा बैठकीत सांगितले.
जिल्हा परिषदेच्या खेडकर सभागृहात नागपूर ग्रामीण व हिंगणा तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा व पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या आराखड्यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवकांनी संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार समीर मेघे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने तसेच पंचायत समिती सदस्य, उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब कोळेकर, तहसीलदार सुशांत बन्सोडे, गटविकास अधिकारी कोवे आदी उपस्थित होते.
नागपूर ग्रामीण तसेच हिंगणा तालुक्यातील गावनिहाय पाणीटंचाईसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंजूर आराखड्यानुसार व अतिरिक्त मंजूर योजनेनुसार ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, अशा गावांसाठी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तात्काळ तयार करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवा, तसेच टँकरद्वारा पाणी पुरवठा आवश्यक असलेल्या गावांचा प्रस्तावही तात्काळ मंजूर करा. पाणीटंचाई निवारणासाठी विहीर खोलीकरण करताना संपूर्ण उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरेल यादृष्टीने खोलीकरणाचे प्रस्ताव तयार करा, तसेच विंधन विहिरी घेताना टंचाई असलेल्या भागाला प्राधान्य द्या, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पाणीटंचाईसंदर्भात तीन टप्प्यात उपाययोजना राबविण्यात येणार असून, यामध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, सार्वजनिक विहीर खोलीकरण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, खासगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना राबविण्यात येणार असून, या संपूर्ण उपाययोजनांद्वारे ३० जूनपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. प्रस्तावित उपाययोजनेनुसार १८८ गावांसाठी ३५२ उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी १३५ गावातील २३० उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत.
नागपूर ग्रामीण तसेच हिंगणा तालुक्यासाठी विंधन विहिरी दुरुस्तीसाठी असलेले युनिट अपूर्ण असल्यामुळे अतिरिक्त युनिट देण्यासंदर्भात यावेळी सूचना करण्यात आल्या.
पाणीटंचाईसंदर्भात प्रस्ताव सादर करताना भूजल सर्वेक्षण यंत्रणेने ३१ मार्चअखेरपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे तसेच ५ एप्रिलपर्यंत टंचाई आराखड्यानुसार प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेऊन १० एप्रिलपासून कामांना सुरुवात करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.
आमदार समीर मेघे यांनी हिंगणा तालुक्यातील गावनिहाय कामांचा आढावा घेताना ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा गावांमध्ये प्राधान्याने खासगी विहिरींचे अधिग्रहण करा, अशा सूचना दिल्या. उन्हाळ्यामध्ये कुठल्याही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, यादृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी संयुक्तपणे बसून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाणीटंचाई मंजूर आराखडा व संभाव्य पाणी पुरवठा आराखड्याची अंमलबजावणी १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत करावयाची असल्यामुळे प्रत्येक गावात प्रस्तावित केलेल्या योजनानिहाय कामांचे नियोजन करून कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा, अशा सूचना दिल्या. पंचायत समिती नागपूरअंतर्गत २६ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरपंच व ग्रामसेवकांनी टंचाई आराखड्यानुसार गावात प्रस्तावित असलेली कामे अतिरिक्त नियोजन तसेच पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसंदर्भात बैठकीत माहिती दिली. गटविकास अधिकारी कोवे यांनी प्रास्ताविकात पाणीटंचाई आराखड्यासंदर्भात माहिती दिली.(प्रतिनिधी)
१७ गावांमध्ये ३८ टँकरद्वारे पाणी पुरवठा
नागपूर ग्रामीण तसेच शहरालगतच्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १७ गावात ३८ टँकरद्वारा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये बेसा-बेलतरोडी, गोधनी, बोखारा, बुटीबोरी, सुराबर्डी, शंकरपूर, बोथली, लावा आदी भागांचा समावेश आहे. बेसा व बेलतरोडी या भागाला अतिरिक्त १० विंधन विहिरी तसेच १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिल्या.