नागपूर : संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ६५ ते ७० टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर करावे. तसेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी नागपुरात केली.
देशमुख म्हणाले, आरक्षण मर्यादा वाढवून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रस्तावाची गरज असेल तर राज्य सरकारने विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे. शरद पवार यांची देखील अशीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध त्यांनी निषेध केला. पोलीस अधिक्षक स्तरावर हा निर्णय होऊ शकत नाही. या मागचा ‘जनरल डायर’ कोण हे शोधण्याची गरज आहे.
पटेलांवर नेम, शरद पवार करणार विदर्भ दौरा- अनिल देशुख यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्यावरही नेम साधला. ते म्हणाले, पटेल हे राष्ट्रवादीचे विदर्भातील मोठे नेते होते. विदर्भात जर पक्षाचा अपेक्षित विस्तार झाला नसेल तर त्यासाठी तेच जबाबदार आहेत. आता पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शरद पवार हे स्वत: ऑक्टोबरमध्ये भंडारा व गोंदियाचा तसेच नोव्हेंबरमध्ये नागपूरचा दौरा करणार आहेत. शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्याप्रति लोकांमध्ये सहानुभूति आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.
वेळ आल्यावर भाजपची ऑफर जाहीर करू- अडीच वर्षांपूर्वी भाजपने आपल्याला समझोता करण्याची ऑफर दिली होती. आपण त्याला नकार देताच दुसऱ्याच दिवशी घरावर धाडी घातल्या गेल्या. आपल्याकडे या समझोत्याचा ‘ड्राफ्ट’ आहे. योग्य वेळ आल्यावर आपण ते जाहीर करू, असा इशाराही देशमुख यांनी दिला. आपण जर त्यावेळी समझोता केला असता तर अडीच वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असते, असा दावाही त्यांनी केला.