कोरोनाबाधित पोलिसांमुळे रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:04+5:302021-09-14T04:12:04+5:30
नागपूर : पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी पुढे आले असले तरी कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत सोमवारी ...

कोरोनाबाधित पोलिसांमुळे रुग्णसंख्येत वाढ
नागपूर : पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी पुढे आले असले तरी कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत सोमवारी त्याची नोंद घेण्यात आली. यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत १४ ने भर पडली. या पोलिसांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकी ३० असे एकूण जवळपास ३०० जणांची चाचणी केली जात आहे.
गुप्तवार्ता विभागात काम करणाऱ्या पोलिसांसाठी पुण्यात ३० ऑगस्ट ते ९ ऑगस्ट दरम्यान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपुरातील ३३ महिला-पुरुष सहभागी झाले होते. नागपुरात आल्यावर काहींना सर्दी, पडसे तर काहींना तापाची लक्षणे दिसून आली. यामुळे सर्वांची अँटिजन चाचणी केली असता १२ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. पाच दिवसानंतर पुन्हा या सर्व पोलिसांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. सध्या १२ बाधितांना आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. सर्वांचे लसीकरण झाले असल्याने प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
- सुटीच्या दिवशी चाचण्या कमी होणे चिंतेची बाब
रविवार सुटीचा दिवस असल्याने ३,२३५ चाचण्या झाल्या. शनिवारच्या तुलनेत हजार चाचण्या कमी झाल्या. सुटीच्या दिवशी चाचण्या कमी होणे चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोमवारी केवळ एक रुग्ण बरा झाला. सध्या कोरोनाचे ७६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,१३४ तर मृतांची संख्या १०,११९ वर स्थिर आहे.
-आमदार निवासात रुग्णसंख्येचा घोळ
जिल्हा माहिती कार्यालयानुसार मागील दोन दिवसापासून आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये ११ रुग्ण भरती असल्याचे दाखविले जात आहे. परंतु बाधित पोलिसांना याच सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याने रविवारपासून २५ रुग्ण भरती आहेत. या रुग्णसंख्येतील घोळाकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ३,२३५
शहर : १४ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,१३४
ए. सक्रिय रुग्ण :७६
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,९३९
ए. मृत्यू : १०,११९