योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षभरात शहरातील गंभीर गुन्ह्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला. पोलिस अधिकाऱ्यांकडून महिला सुरक्षेचे मोठमोठे दावे करण्यात आले होते. मात्र एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीत अल्पवयीन मुली व महिला आता सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. वर्षभरात महिला अत्याचार व विनयभंगांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये महिला अत्याचारांमध्ये वाढ दिसून आली. जर आकडेवारीची सरासरी काढली तर महिन्याला सरासरी २४ गुन्ह्यांची नोंद झाली. ही आकडेवारी महिला सुरक्षेचे दावे करणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहे.
लोकमत'ला प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत नागपुरात महिला अत्याचाराच्या २८५ घटनांची नोंद झाली. दर महिन्याला अत्याचारांची सरासरी जवळपास २४ इतकी होती. २०२३ मध्ये महिला अत्याचाराच्या २६३ गुन्ह्यांची नोंद झाली होती व दर महिन्याची सरासरी २२ इतकी होती. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे परिचयातीलच व्यक्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक चतुर्थांशहून अधिक प्रकरणात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले.
विनयभंगांचा आकडा चिंताजनकच नागपुरात भर रस्त्यांवर होणाऱ्या विनयभंगाच्या घटना मोठा चिंतेचा विषय आहे. २०२३ मध्ये विनयभंगाच्या ५०६ घटनांची नोंद झाली होती.२०२४ मध्ये पोलिसांनी विनयभंगाच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात त्यामुळे गुन्हेगारांवर फारसा वचक नसल्याचे चित्र आहे. २०२४ मध्ये ४९० हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात ३१५ हून अधिक पुरुष व १५ महिलांना अटक करण्यात आली.
महिलांचादेखील आरोपींमध्ये समावेश २०२४ मध्ये २०० पुरुष आरोपींना अटक करण्यात आली. तर दोन महिलांवरदेखील गुन्हे नोंदवत त्यांना ताब्यात घेण्यात आले. महिला अत्याचाराच्या प्रकरणांत महिलादेखील आरोपी निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महिनानिहाय गुन्हे (अत्याचार)महिना २०२४ २०२३जानेवारी २२ २० फेब्रुवारी २० १४ मार्च २८ १८ एप्रिल २७ २६ मे २५ ३०जून ३२ २३ जुलै २५ २७ ऑगस्ट २५ २० सप्टेंबर २२ २-ऑक्टोबर २३ १७ नोव्हेंबर १२ १७ डिसेंबर १३ १५
महिनानिहाय गुन्हे (विनयभंग)महिना २०२४ २०२३जानेवारी ४२ ४२ फेब्रुवारी ४० ३५ मार्च ३३ ४७ एप्रिल ३९ ३९ मे ४८ ४७ जून ३८ ४२ जुलै ३९ ४९ ऑगस्ट ४२ ४८ सप्टेंबर ५४ ४० ऑक्टोबर ७५ ५२ नोव्हेंबर ३३ ३० डिसेंबर ४१ ३२