अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ
By Admin | Updated: May 30, 2015 02:48 IST2015-05-30T02:48:51+5:302015-05-30T02:48:51+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने ....

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ
हायकोर्ट : रिट याचिका मंजूर
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी मुंबईचा डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याची फौजदारी रिट याचिका मंजूर करून त्याच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ केली.
अरुण गवळीला मुलाच्या लग्नासाठी ३० एप्रिल रोजी पंधरा दिवसांची सशर्त पॅरोल मंजूर झाली होती. पॅरोलची मुदत २१ मेपर्यंत होती. १३ मे रोजी त्याने आपल्या ८६ वर्षीय वृद्ध आईच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पॅरोल ३० दिवसांनी वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज नागपूर विभागीय आयुक्तांकडे केला होता. आयुक्तांनी अर्जावर तातडीने निर्णय न घेतल्याने त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याला आधी २६ आणि नंतर २९ मेपर्यंत दिलासा दिला होता. न्यायालयाने उत्तरासाठी राज्य सरकारला नोटीस जारी केली होती. गवळीच्या आईचा आजार गंभीर आजाराच्या यादीत मोडत नाही. त्यामुळे त्याला पॅरोल वाढवून देण्यात येऊ नये, असे सरकारने आपल्या निवेदनात नमूद केले होते.
शुक्रवारी न्यायालयाने गवळीच्या वकिलांचा आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून गवळीची याचिका मंजूर केली. त्याला १२ जूनपर्यंत पॅरोल मंजूर केला. न्यायालयात गवळीच्या वतीने वरिष्ठ वकील अॅड. अनिल मार्डीकर आणि अॅड. मीर नगमान अली यांनी तर सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील शिशीर उके यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)