‘व्हीसीए’च्या प्रतिज्ञापत्रात चुकीची नावे
By Admin | Updated: February 4, 2017 03:04 IST2017-02-04T03:04:02+5:302017-02-04T03:04:02+5:30
विदर्भ क्रिकेट संघटनेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे चुकीची लिहिली.

‘व्हीसीए’च्या प्रतिज्ञापत्रात चुकीची नावे
हायकोर्ट : प्रकरणात तिघांना केले प्रतिवादी
नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे चुकीची लिहिली. संघटनेचे वकील अक्षय नाईक यांनी ही चूक मान्य करून आवश्यक दुरुस्ती करणार असल्याचे शुक्रवारी सांगितले.
२९ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या सुरक्षाविषयक बैठकीमध्ये अन्य अधिकाऱ्यांसोबत पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार व पोलीस उपायुक्त संभाजी कदम उपस्थित होते. परंतु, संघटनेने बैठकीमध्ये पोलीस उपायुक्त अमितेशकुमार व पोलीस उपायुक्त शिवाजी जाधव उपस्थित होते असे चुकीचे लिहिले. ही चूक दुरुस्त करण्यात येणार आहे. हिंगणा पोलीस ठाण्यात दाखल दोन एफआयआर रद्द करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल व अन्य पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या अर्जामध्ये पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी व हिंगण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने यासाठी अनुमती प्रदान केली आहे.
प्रकरणावर ९ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.(प्रतिनिधी)