अतुलनीय किल्लेकार

By Admin | Updated: November 11, 2015 02:23 IST2015-11-11T02:23:17+5:302015-11-11T02:23:17+5:30

महाराष्ट्राला किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव लाभले आहे. दोन-चार शिवकालीन किल्ले सोडल्यास, इतर किल्ले काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Incomparable castle | अतुलनीय किल्लेकार

अतुलनीय किल्लेकार

नागपूर : महाराष्ट्राला किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव लाभले आहे. दोन-चार शिवकालीन किल्ले सोडल्यास, इतर किल्ले काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ला हा निव्वळ इतिहास नाही, तर वास्तुकलेचा अद्भूत नमुना आहे. किल्ल्यांचे जतन, संवर्धन झाले पाहिजे या भावनेतून मध्य रेल्वेत लोकोपायलट असलेले अतुल गुरू एक अभियान राबवित आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व किल्ले नागपुरात साकारले आहे. किल्लेकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

दिवाळीला बहुतांश लहान मुले किल्ले साकारताना दिसतात. अतुल यांनाही बालपणापासूनच किल्ले साकारण्याची आवड होती. नागपूर त्रिशताब्दीपर्यंत अतुल काल्पनिक किल्ले साकारायचे. मात्र त्यानंतर विदर्भातील किल्ले साकारण्यास त्यांनी सुरुवात केली. हुबेहूब किल्ला साकारण्याची त्यांची किमया बघून काहींनी त्यांना शिवकिल्ले साकारण्याचा सल्ला दिला. २००८ पासून ते शिवकिल्ले नागपुरात साकारत आहेत. किल्ला निर्मिती करताना वास्तूपेक्षा वस्तूंना जास्त महत्त्व देतात. कुठलाही किल्ला साकारण्यापूर्वी किल्ल्याचे बारकावे जाणून घेण्यासाठी स्वत: किल्ल्यांना भेटी देतात. किल्ल्यावर लिहिलेले पुस्तक चाळतात. त्याचा अभ्यास करून, किल्ल्याची निर्मिती करतात. किल्ल्यावरील प्रत्येक गोष्ट त्यांनी साकारलेल्या किल्ल्यांमध्ये दर्शवितात. नागपुरातील वेगवेगळ्या भागात अतुल यांनी रायगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळगड, सिंधुदुर्ग, सज्जनगड आदी किल्ले साकारले आहेत.
अतुल हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. किल्ला निर्मितीचा त्यांनी छंद जोपासला आहे. त्यांनी आपल्या घरीच वर्कशॉप काढले आहे. या वर्कशॉपमध्ये तटबंदी, बुरुज, गोमुखी, राणीवसा, दारुकोठार, घोडपाग, हत्तीपाग, शरभशिल्प, खिंड, तोफ, पडकोट, वृंदावण, चरीया, जंग्या, विरंगळ किल्ल्यांशी निगडित असलेल्या वस्तू साकारल्या आहे. जवळपास १६ किल्ल्यांच्या वास्तू त्यांच्या घरी आहे.
लहानग्यांमध्ये सुद्धा कुतुलह निर्माण व्हावे म्हणून शाळा-शाळांमध्ये किल्ले निर्मितीचे वर्कशॉप घेतात. शेकडो मुले त्यांच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होतात. मुलांना टाकावू वस्तूंपासून किल्ल्याच्या वास्तू साकारायला शिकवितात. किल्ल्यांप्रति समर्पणामुळे त्यांची ख्याती विदर्भभर पसरली आहे. किल्ल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी दुर्ग प्रतिष्ठानची स्थापना केले आहे. त्यांच्या मदतीला अ‍ॅड. रवींद्र खापरे, दत्तात्रय सोनेगावकर, शीतल ताम्हण, धनंजय डेग्वेकर, सोहम अपराजित, विशाल देवकर, तुषार घोडमारे, स्वरुपा अपराजित, परिमल पाटणकर, डॉ. शिल्पा भिवापुरकर ही मंडळीसुद्धा सक्रिय सहभागी झाली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Incomparable castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.