काँक्रिट डेव्हलपर्सवर आयकर धाडी
By Admin | Updated: December 2, 2015 03:01 IST2015-12-02T03:01:17+5:302015-12-02T03:01:17+5:30
कर चुकवेगिरी करणाऱ्या मोठ्या समूहावर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. त्याअंतर्गत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स क्षेत्रातील ...

काँक्रिट डेव्हलपर्सवर आयकर धाडी
बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे जप्त : बँकांमधील खाते गोठवले
नागपूर : कर चुकवेगिरी करणाऱ्या मोठ्या समूहावर आयकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. त्याअंतर्गत बिल्डर्स आणि डेव्हलपर्स क्षेत्रातील आघाडीच्या काँक्रिट डेव्हलपर्सची कार्यालये आणि निवासस्थानावर आयकर विभागाने मंगळवारी धाडी टाकून कोट्यवधींच्या अवैध संपत्तीची कागदपत्रे जप्त केली असून, बँकेतील खाते गोठवल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
संजय एन. पैडलवार आणि नीलेश रामचंद्र चोरडिया अशी कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदारांची नावे आहेत. काँक्रिट समूहाची काँक्रिट डेव्हलपर्स आणि काँक्रिट बिल्डकॉन प्रा.लि.अशी दोन फर्म आहेत. समूहाची कार्यालये रामदासपेठ, कॅनॉल रोड आणि गांधीनगर येथे आहे. आयकर अधिकाऱ्यांनी कार्यालये आणि निवासस्थानावर धाडी टाकल्याची माहिती आहे. विभागाने एकूण सात ठिकाणांपैकी तीन ठिकाणी धाडी तर चार ठिकाणी तपासणीची कारवाई केली. त्यात संजय पैडलवार आणि नीलेश चोरडिया यांच्या रामदासपेठेतील निवासस्थानांचा समावेश आहे. या कारवाईत ५० अधिकारी सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धाडीदरम्यान जमीन खरेदी आणि बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत. याशिवाय काँक्रिट समूहाचे नोंदणीकृत सौदे आणि ग्राहकांकडून घेतलेली ४० टक्के रकमेची कागदपत्रे अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. ग्राहकांकडून घेतलेल्या रकमेची खात्यात नोंदणी केली नसल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. याशिवाय रोख आणि दागिनेसुद्धा अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती आहे. हा समूह १९९४ पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. लक्झरीयस अपार्टमेंट, निवासी व व्यावसायिक प्रकल्प आणि हॉटेलचे बांधकाम करते. समूहाने नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या काही भागात ७० प्रकल्प पूर्ण केले आहेत. याशिवाय नागपूर आणि अन्य शहरात रिटेल शॉपिंग सेंटर्स, आॅफिस बिल्डिंंग, इंडस्ट्रीयल बिल्डिंग, अपार्टमेंट प्रकल्प, निवासी फ्लॅट योजना उभारल्या असून जमीन विकासक म्हणून समूह कार्य करते. काही प्रकल्पात ७० टक्के तर काही प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. आयकर खात्याची धाडीची कारवाई बुधवारीही सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)