काँक्रिट डेव्हलपर्सवर आयकर कारवाई सुरूच
By Admin | Updated: December 4, 2015 03:16 IST2015-12-04T03:16:11+5:302015-12-04T03:16:11+5:30
आयकर विभागाने काँक्रिट समूहावर १ डिसेंबरला टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ३५ लाख रोख आणि १ किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

काँक्रिट डेव्हलपर्सवर आयकर कारवाई सुरूच
कार्यालयांची तपासणी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त
नागपूर : आयकर विभागाने काँक्रिट समूहावर १ डिसेंबरला टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ३५ लाख रोख आणि १ किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या समूहाकडून आतापर्यंत जप्त केलेली रक्कम आणि दागिने अत्यल्प असून धाडीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच खरी बाब पुढे येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
काँक्रिट समूहाच्या दोन कंपन्यांची कार्यालये आणि निवासस्थानावर आयकर विभागाचे ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १ डिसेंबरला धाडी टाकल्या होत्या. संजय एन. पैडलवार आणि नीलेश रामचंद्र चोरडिया अशी कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदारांची नावे आहेत. रोख रक्कम आणि दागिने संजय पैडलवार यांच्या घरून जप्त केली.
दोन्ही भागीदारांची घराची तपासणी पूर्ण झाली असून समूहाच्या रामदासपेठ आणि गांधीनगर येथील कार्यालयात धाडीची कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. समूहाच्या भागीदारांनी खरे उत्पन्न दडवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांना सापडलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले आहे. याशिवाय समूहाने अनेक ग्राहकांकडून घेतलेल्या रोख रकमेची खात्यात नोंद केलेली नाही. तसेच रजिस्ट्री रेडिरेकनर दरापेक्षा कमी दरात केल्याने कलम ५० सी चे उल्लंघन केल्याचे दिसून आले. अधिकारी सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करीत आहे. दडवून ठेवलेले उत्पन्न आणि दागिन्यांचा खरा आकडा लवकरच बाहेर येईल, असे सूत्रांनी सांगितले.
हा समूह १९९४ पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या काही भागात ७० प्रकल्प पूर्ण केले आहेत.
याशिवाय नागपूर आणि अन्य शहरात रिटेल शॉपिंग सेंटर्स, आॅफिस बिल्डिंंग, इंडस्ट्रीयल बिल्डिंग, अपार्टमेंट प्रकल्प, निवासी फ्लॅट योजना उभारल्या आहेत. (प्रतिनिधी)