पडीक जमिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 21:50 IST2023-01-24T21:50:20+5:302023-01-24T21:50:55+5:30
Nagpur News कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणारी जमीन प्रति वर्ष ७५ हजार रु. प्रतिहेक्टर या दराने भाडेतत्त्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे.

पडीक जमिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी; प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये मिळणार
नागपूर : कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणारी जमीन प्रति वर्ष ७५ हजार रु. प्रतिहेक्टर या दराने भाडेतत्त्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील महावितरणच्या ४१ उपकेंद्रांपासून ५ किलोमीटरपर्यंतच्या, तसेच रस्त्यालगतच्या जमिनीची महावितरणला गरज असून त्यासाठी संपर्क करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा वीज वाहिन्यांचे या योजनेच्या माध्यमातून ३ हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून, याकरिता १५ हजार एकर जमिनीवरून ४ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.
या योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देताना जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या ६ टक्के दरानुसार परिगणत केलेला दर किंवा प्रतिवर्ष ७५ हजार रुऋ प्रतिहेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्यादराने वार्षिक भाडेपट्ट्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर प्रत्येकी वर्षी ३ टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येईल.
नागपूर जिल्ह्यातील तालुका व उपकेंद्रनिहाय जमिनीची आवश्यकता अशा प्रकारे आहे. भिवापूर तालुक्यातील जावळी, कारगाव, चिकलापूर, कुही-कुही, पाचखेडा, अंभोरा, डोंगरगाव, अदम, चाफेगडी, उमरेड-सिरसी, पाचगाव, उमरेड, कळमेश्वर-कळमेश्वर शहर, कोल्ही, मोहपा (गडबर्डी), तळेगाव, धापेवाडा, गोंडखैरी, पारशिवनी, नवेगाव, सावनेर-सावनेर, नांदा, खापा, चारगाव, मौदा-चिरवा, खात, अरोली, रामटेक- नगरधन, रामटेक, काटोल-पारडसिंगा, मसोद, कचरीसावंगा, मूर्ती, कोंढाळी, एनवा, कामठी-ड्रॅगन पॅलेस, गुमटाळा, नरखेड तालुक्यातील न्यू बारासिंगी, मोवाड, लोहारी सावंगा, वडविहारा (उमठा) या उपकेंद्रांचा समावेश आहे.
येथे करा संपर्क
शेतकऱ्यांनी आपली जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी www.mahadiscom.in/land_bank_portal/index_mr.php. या संकेतस्थळावर अर्ज करावा, तसेच नागपूर जिल्ह्यातील माहितीबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोहन कऱ्हाडे किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.