नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:51 IST2019-07-02T21:49:44+5:302019-07-02T21:51:33+5:30
कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच नव्हे तर मनाई असतानाही कंडक्टर मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले. विविध कंडक्टरकडून असे आठ मोबाईल जप्त करण्यात आले.

नागपूरच्या आपली बसमधील कारनामा : निलंबित कंडक्टर देतोय तिकीट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच नव्हे तर मनाई असतानाही कंडक्टर मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले. विविध कंडक्टरकडून असे आठ मोबाईल जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या परिवहन समितीच्या दिशानिर्देशानुसार बसच्या आकस्मिक तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहेत. गेल्यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या पथकाने धडक कारवाई केली. त्यावेळी आपली बसला आर्थिक फटका देणाºया कंडक्टरचा भंडाफोडही झाला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून तिकिटांचे पैसे हडप करण्याचे प्रकारही समोर आले होते. हा गोरखधंदा अजूनही सुरूच आहे. याची माहिती असल्यामुळे पथक पुन्हा सक्रिय झाले. पथकाने सोमवारी काही मार्गांवरील बसची आकस्मिक तपासणी केली. यावेळी बस क्रमांक एमएच ३१ सीए ०३८८ मध्ये दोन कंडक्टर असल्याचे दिसून आले. ड्युटीवर असेलेले फूद्दन मोहोड व निलंबित (आईडी लॉक) करण्यात आलेले नंदकिशोर खंगार यांचा यात समावेश होता. खंगार हे प्रवाशांना तिकीट देत होते. त्याचप्रकारे बर्डी-कामठी मार्गावर बस क्रमांक एमएच ३१ सीए ०४१४ मध्येही निलंबित कंडक्टर प्रेम सहानी हे प्रवाशांना तिकीट देत असल्याचे आढळून आले. त्यांच्यासोबत ड्युटीवर असलेले कंडक्टर संदीप पहाडे देखील होते. याची गंभीर दखल घेण्यात आली.
बसमध्ये कंडक्टरला मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही बर्डी, शांतीनगर, कामठी, पिपळा फाटा, पारडी, कळमेश्वर मार्गावरील बसमध्ये कंडक्टरजवळ मोबाईल असल्याचे आढळून आले. असे एकूण आठ मोबाईल जप्त करण्यात आले. कंडक्टरजवळ मोबाईल आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारून मोबाईल परत दिला जातो. या कारवाईमुळे कंडक्टरचे धाबे दणाणले आहे.