राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन
By Admin | Updated: February 22, 2015 02:41 IST2015-02-22T02:41:54+5:302015-02-22T02:41:54+5:30
देशभरातील उत्कृष्ट केंद्रांवर तयार झालेल्या हातमाग उत्पादनांच्या प्रदर्शनाचे कस्तूरचंद पार्कवर आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : देशभरातील उत्कृष्ट केंद्रांवर तयार झालेल्या हातमाग उत्पादनांच्या प्रदर्शनाचे कस्तूरचंद पार्कवर आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे उपस्थित होते. हे प्रदर्शन ३१ मार्चपर्यंत चालणार आहे.
वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक रिचा बागला, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे सहप्रबंध संचालक डी.एम. बावने आणि महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये टसर सिल्क व कॉटन साड्या, ड्रेस मटेरियल, बेड शिट्स, चादर, गालीचे, वूलन शॉल्स, सोफा कव्हर, पिलो कव्हर, टॉवेल्स व अन्य वस्तूंवर २० टक्के सूट देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या गृहोपयोगी व सजावटीच्या वस्तूंच्या अनेक व्हेरायटीज माफक दरात उपलब्ध आहेत. या कपड्यांमध्ये नवीन फॅशन सोबतच पारंपरिकतेचीही जोड देण्यात आली आहे. हातमागच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी तसेच ग्राहकांना हातमागची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अनेक शहरांमध्ये हे प्रदर्शन लावण्यात येते. या प्रदर्शनासाठी इंद्रायणी हँडलूम प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या हातमाग विभागातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, उत्पादने व इतरही माहितीसाठी कस्तूरचंद पार्कवर विशेष स्टॉल लावण्यात आला आहे. या ठिकाणी ग्राहकांना सविस्तर माहिती मिळणार आहे. (वा.प्र.)