उत्तर नागपुरात अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे समस्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:05+5:302021-02-05T04:53:05+5:30
नागपूर : उत्तर नागपुरातील दीक्षित नगर, म्हाडा कॉलनी, शेंडे नगर, पार्वती नगर, माजरी, डॉ. आंबेडकर नगर, लष्करीबाग, इंदोरा, ...

उत्तर नागपुरात अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे समस्या वाढल्या
नागपूर : उत्तर नागपुरातील दीक्षित नगर, म्हाडा कॉलनी, शेंडे नगर, पार्वती नगर, माजरी, डॉ. आंबेडकर नगर, लष्करीबाग, इंदोरा, समता नगर, चॉक्स कॉलोनी, संत कबीर नगर, भोसले वाडी, मार्टिन नगर, विश्वास नगर यासह अनेक भागांमध्ये अपुऱ्या आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले असून प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आसीनगर झोनमध्ये मडकी फोडून मनपा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
या परिसरातील नागरिकांना सातत्याने अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सोबतच, अनारोग्याचीही समस्या उद्भवली आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांना निवेदन दिले. नागरिकांची अडचण लक्षात घेता ही समस्या तातडीने दूर करण्याची मागणी यातून केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व राकाँपाचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, सुनील लांजेवार, साजिद अली, महेंद्र भांगे यांनी केले. यावेळी स्मिता वासनिक, प्रणय जांभूळकर आदी उपस्थित होते.