घराघरांत... मनामनांत तिरंगा; साडेपाच लाख घरांवर फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 20:44 IST2022-08-13T20:44:15+5:302022-08-13T20:44:55+5:30
Nagpur News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे.

घराघरांत... मनामनांत तिरंगा; साडेपाच लाख घरांवर फडकला तिरंगा
नागपूर : गरिबाची झोपडी असो की श्रीमंताचा बंगला, कर्मचाऱ्याचे क्वार्टर असो की फ्लॅट स्कीम; नजर फिरेल तेथे थाटात फडकत होता आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’!... शहरातील रस्ते, चौक सजले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शनिवारपासून झाली. याअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी आर. विमला यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांकडून एकूण साडेपाच लाख घरांवर तिरंगा झेंडा फडविण्यात आला. शहरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रासुद्धा काढली.
तिरंगा पदयात्रेत गडकरी, फडणवीसांचा सहभाग
- महापालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी त्रिशताब्दी चौक ते त्रिशरण चौकापर्यंत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., माजी आमदार गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, नाना शामकुळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, आदी यात सहभागी झाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
वासनिक, पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसची आजादी गौरव यात्रा
- प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात दक्षिण नागपुरातील क्रीडा चौकातून आजादी गौरव यात्रा काढण्यात आली. खासदार मुकुल वासनिक यांनी राष्ट्रध्वज उंचावत प्रारंभ केला. पदयात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, नाना गावंडे, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, प्रवीण गवरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. १४ ऑगस्टला मध्यरात्री १२.०५ वाजता देवडिया काँग्रेस भवनावर ध्वजारोहण करून स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाची ध्वनिफीत लावण्यात येणार आहे.