अंधारात जखमी बिबट्याला हाताने जाळ्यात पकडले; देवलापारच्या जंगलात रेस्क्यू टीमचे साहस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 21:55 IST2022-05-09T21:54:33+5:302022-05-09T21:55:02+5:30
Nagpur News नागपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या देवलापारच्या जंगलात ८ मेच्या रात्री वन वनकर्मचाऱ्यांनी आणि रेस्क्यू टीमने साहस केले. जखमी झालेल्या एका बिबट्याला अंधाऱ्या रात्री जाळे टाकून हाताने पकडले.

अंधारात जखमी बिबट्याला हाताने जाळ्यात पकडले; देवलापारच्या जंगलात रेस्क्यू टीमचे साहस
नागपूर : नागपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या देवलापारच्या जंगलात ८ मेच्या रात्री वन वनकर्मचाऱ्यांनी आणि रेस्क्यू टीमने साहस केले. जखमी झालेल्या एका बिबट्याला अंधाऱ्या रात्री जाळे टाकून हाताने पकडले. जीवावर उदार होऊन ही मोहीम फत्ते करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आणि पथकाचे कौतुक होत आहे.
एक बिबट्या जखमी अवस्थेत असल्यासंदर्भात रेस्क्यू कॉल होता. वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व रितेश भोंगाडे यांच्या सूचनेनंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची टीम तातडीने निघाली. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. घटनास्थळी पोहोचेपर्यंत रात्रीचे ८ वाजले. बेशुद्ध करण्याचे साहित्य सोबत असले तरी पर्याय मात्र संपले होते. त्याला हाताने पकडणे हाच पर्याय होता. अशा स्थितीत रेस्क्यू टीमने हिंमत बांधली. तो जखमी असला तरी हालचाल करीत असल्याने त्याला झुडपातून पकडणे एक आव्हानच होते. तो काटेरी झुडपातून पळत होता, पथक त्याच्या मागावर होते, काही खड्ड्यात पडले, काहींना काट्यांनी ओरबाडले, पण शेवटी त्याला हातांनी पकडलेच. हिमतीच्या बळावर हे रेस्क्यू पूर्ण झाले.
उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा आणि राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण झाली. देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व त्यांची टीम होती. डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. पूर्वा निमकर, सिद्धांत मोरे, वनरक्षक मुसळे, बंडू मंगर, शुभम मंगर, विलास मंगर, स्वप्निल भुरे, चेतन बारस्कर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.
बिबट्याच्या शरीरावर जुन्या जखमा
बिबट्याला उपचारासाठी रात्रीच ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक असून शरीरावर जुन्या जखमाही आहेत. तो अशक्त असून त्याच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
...