शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

By योगेश पांडे | Published: March 13, 2024 07:42 PM2024-03-13T19:42:37+5:302024-03-13T19:43:57+5:30

शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे.

In the centenary year, Panch transformation is the same working formula from the Sangh | शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र; उद्यापासून नागपुरात अ.भा.प्रतिनिधी सभा  

नागपूर: शुक्रवारपासून नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होणार असून त्या दृष्टीने पुढील वर्षभर संघाकडून पंच परिवर्तन हेच कार्यसूत्र राहणार आहे. यात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि स्व-आधारित व्यवस्थेचा आग्रह आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल व यावर प्रतिनिधी सभेत मंथन होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली. नागपुरात रेशीमबागेत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

तीन दिवसीय प्रतिनिधी संमेलनाच्या प्रस्तावांवर गुरुवारी संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. पंचपरिवर्तन अंतर्गत सामाजिक परिवर्तनाचे काम केले जाणार आहे. देशाच्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना त्यांच्या नागरी कर्तव्याची जाणीव करून दिली जाईल. प्रतिनिधी सभेच्या सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे गत काळात केलेल्या संघाच्या कार्याची माहिती देतील. तसेच आगामी योजनांवर चर्चा केली जाईल. सरसंघचालक आणि सरकार्यवाह यांच्या वर्षभराच्या प्रवासाचे वेळापत्रकही ठरविण्यात येणार आहे. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या कार्याचा आणि विशेषत: संघ शाखांची संख्या एक लाखांहून अधिक करण्याच्या लक्ष्याचा आढावा घेतला जाईल. संघाच्या शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्याबाबत विचारमंथनही होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया, सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार व आलोक कुमार उपस्थित होते.

भाजप अध्यक्ष येण्याची शक्यता
संघाच्या सभेला देशभरातून १५२९ प्रतिनिधी अपेक्षित आहेत. या बैठकीसाठी भाजपसह संघ परिवारातील ३६ संघटनांचे अध्यक्ष आणि संघटन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाही नागपुरात येण्याची शक्यता आहे.

नागपुरात सहा वर्षांनंतर बैठक
संघातर्फे दरवर्षी अ.भा.प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दर तीन वर्षांनी हे आयोजन मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होते. २०१८ मध्ये नागपुरात सभा झाली होती. २०२१ मध्ये कोरोनामुळे आयोजन झाले नव्हते. अशा स्थिती सहा वर्षांनंतर प्रतिनिधी सभेचे रेशीमबागेत आयोजन करण्यात येत आहे.

अहिल्याबाईंचे त्रिशताब्दी वर्ष साजरे करणार
२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या अभिषेकने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे.हे चांगले वातावरण निर्माण होण्याचे शुभ लक्षण आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडण्यात येईल, असे आंबेकर यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रैशताब्दी वर्षानिमित्त संघातर्फे मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: In the centenary year, Panch transformation is the same working formula from the Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.