नागपूर : मैत्रीणीला ईम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये नाशिकमधील एक चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण चोर बनला. मैत्रीणीला लाँग ड्राईव्हवर नेऊन तो घरी पोहचला अन् काही वेळेतच पोलिसांनी त्याला अटक केली. प्रणिल मोरे (वय २८) असे त्याचे नाव असून तो सिन्नर, नाशिक येथील रहिवासी आहे.
अलिकडेच विकत घेतलेली सव्वालाख रुपयांची बुलेट रेल्वे स्थानकाच्या पार्किंग मध्ये लावून २१ मार्चला येथील फिर्यादी उज्जैनला दर्शनाला गेले. २४ मार्चला परत आल्यानंतर त्यांना त्यांची बुलेट पार्किंगमध्ये दिसली नाही. ती चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, उपअधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गाैरव गावंडे यांच्या नेतृत्वात हवलदार पुष्पराज मिश्रा, अंमलदार प्रवीण खवसे, मझहर अली यांनी तपास सुरू केला.असा मिळाला क्लूचोरट्या तरुणाने बुलेट चोरल्यानंतर वर्धा गाठली तेथे हेल्मेट नसल्याने त्याला ट्रॅफिक पोलिसांनी रोखले आणि चालान फाडले. त्याचा मेसेज बुलेट मालकाच्या मोबाईलवर आला. तपासासाठी तोच क्लू ठरला. बुलेट मालकाने पोलिसांना ती माहिती देताच रेल्वे पोलिसांचे पथक वर्धा येथे पोहचले. तेथे बुलेट चालविणारासोबत एक तरुणी होती, तेदेखिल स्पष्ट झाले. तेथून तो अमरावती मार्गे अकोल्याकडे जाणार असल्याचेही उघड झाले. पुढे बोरगाव मंजू (अकोला) येथेसुद्धा ट्रॅफीक पोलिसांनी त्याची चालान बनविली. यावेळी तेथील ट्रॅफिक शिपायाने बुलेट चालकाचे मोबाईलमध्ये छायाचित्र घेऊन त्याचा नंबरही घेतला. पुन्हा चालानचा मेसेज बुलेट मालकाच्या मोबाईलवर आला.
लोकेशन झाले ट्रेस
यावेळी चोरट्याचा मोबाईल नंबर मिळाल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना कळत होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी नाशिक मार्गावरच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणी करून त्यांची मदत केली. त्यामुळे मैत्रीणीला घरी सोडून प्रणील स्वत:च्या घरी पोहचताच त्याच्या मागावर असलेले पोलीस तेथे धडकले. त्याला जेरबंद करण्यात आले. अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ २४ तासांच्या आत आरोपीचा छडा लावून त्याला अटक करण्याची कामगिरी रेल्वे पोलिसांनी बजावली.
स्टँडिंग प्लान फसलाआरोपी प्रणील हा सधन कुटुंबातील असून, तो उच्चशिक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी तो मैत्रीणीच्या सगाईसाठी नागपुरात आला होता. रेल्वे स्थानकावर पार्किंगजवळ असताना त्याच्या नजरेस नवीकोरी बुलेट पडली. त्याने स्टँडिंग प्लान बनविला. बुलेट चोरल्यानंतर त्याने सगाईत सहभागी झालेल्या मैत्रीणीला बुलेटनेच नाशिकला (लाँग ड्राईव्हवर) जाऊ, असे म्हणत बुलेटवर बसविले. त्याची मैत्रीणीसोबतची लाँग ड्राईव्हची ईच्छा तर पूर्ण झाली मात्र चोरी अंगलट आल्याने त्याला पोलीस कोठडीत जावे लागले.